माझं ‘त्या’ एकनाथ शिंदेंवर प्रेम नाही; शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे नेमकं काय म्हणाले?
महापालिका, जिल्हा परिषदा, नगरपालिका, मार्केट समिती आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या दृष्टीकोनातून शिंदे गटाकडून कोणतीही ठोस पावलं उचलली जाताना दिसत नाही.
नाशिक : शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे हे शिंदे गटात नाराज आहेत. सुहास कांदे यांनी आपली नाराजी भर पत्रकार परिषदेत बोलून दाखवली आहे. आपल्याला पक्षाच्या, जिल्ह्यातील महत्त्वाच्या बैठकांना आणि पालकमंत्र्यांच्या बैठकांनाही बोलावलं जात नाही. मला कोणत्याही कार्यक्रमाचं आमंत्रणही दिलं जात नाही, अशी खदखदच सुहास कांदे यांनी बोलून दाखवली. त्यामुळे शिंदे गटात सर्व काही अलबेल नसल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.
मी नाराज नाही. पण माझा कुणाशीही संवाद नाही. पक्षीय निर्णय, जिल्ह्यातील बैठकांबाबत माझा संवाद झालाच नाही. मी एकनाथ संभाजी शिंदे या व्यक्तीवर प्रेम करणारा आहे. मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर प्रेम करणारा नाही. तर फक्त एकनाथ शिंदे यांच्यावर प्रेम करणारा आहे.
त्यामुळे त्यांनी काही निर्णय घेतले तरी ते मला मान्य असतील. मला मान अपमान सहन करावा लागला तरी करेल. मरेपर्यंत अपमान सहन करेल. पण मी शिंदेंसोबतच राहील, असं सुहास कांदे म्हणाले.
आमच्या मतदारसंघातील महंतांचं निधन झालं होतं. म्हणून मी मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याला उपस्थित नव्हतो. तसं मी मुख्यमंत्र्यांना कळवलं होतं. दुर्देवाने बैठका होतात त्याची मला माहिती मिळत नाही. मला माहिती दिली तर मी जाईन. पण दुर्देवाने मला बैठकीची माहिती नसते, अशी वेदना त्यांनी बोलून दाखवली.
पालकमंत्री आणि माझ्यात दुरावा नाही. मी त्यांच्या नेतृत्वात काम करतो. पण मला बैठकांना बोलावलं जात नाही हे खरं आहे. आधीच्या पालकमंत्र्यांचा इतिहास पाहिला तर त्यांनी आपल्या आमदारांनासोबत घेऊन बैठका केल्या आहेत. छगन भुजबळ असो की गिरीश महाजन हे पालकमंत्री असताना आपल्या आमदारांना घेऊन बैठका घ्यायचे. पण विद्यमान पालकमंत्री मला बोलवत नाहीत. भाजपचे आमदार बैठकांना जात असतील .त्यांना आमंत्रण असेल. मला आमंत्रण नसतं, अशी खदखदही त्यांनी व्यक्त केली.
महापालिका, जिल्हा परिषदा, नगरपालिका, मार्केट समिती आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या दृष्टीकोनातून शिंदे गटाकडून कोणतीही ठोस पावलं उचलली जाताना दिसत नाही. कारण मी संघटनेत काम केलं आहे.
मी जिल्हाप्रमुख आणि शाखाप्रमुख म्हणून काम केलं आहे. एवढं दुर्देवाने सांगेल, ज्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी झाल्या त्यांच्याकडून निवडणुकीसाठी कोणतीही ठोस पावलं उचलली जात नाही. तशी पावलं उचलताना दिसत नाही, असंही त्यांनी सांगितलं.