विमानतल्या पुढाऱ्यांची लोकलवारी, बहुजन विकास आघाडीच्या मतांसाठी दरेकर, महाजन विरार ट्रेनमध्ये!

| Updated on: Jun 18, 2022 | 4:11 PM

आता विधान परिषद निवडणुकीत हितेंद्र ठाकूर आणि क्षितिज ठाकूर आणि राजेश पाटील या तीन आमदारांची मते कुणाला पडतात, यासाठी पक्षांची रस्सीखेच सुरु आहे

विमानतल्या पुढाऱ्यांची लोकलवारी, बहुजन विकास आघाडीच्या मतांसाठी दरेकर, महाजन विरार ट्रेनमध्ये!
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबईः एरवी हेलिकॉप्टर आणि विमानानं फिरणारे नेते मतांसाठी थेट जमिनीवर उतरून विनंत्या करू शकतात. सामान्यांप्रमाणे लोकल ट्रेनमधूनही प्रवास करू शकतात. मुंबईत आज असंच एक चित्र पहायला मिळालं. येत्या 20 जून रोजी विधान परिषदेच्या निवडणुकीचा (MLC Election) आखाडा रंगणार आहे. याकरिता महाविकास आघाडीसह भाजप नेत्यांनी काटेकोर रणनीती आखली आहे. राज्यसभेच्या निवडणुकीत मोठा दगफटका झाल्यानंतर आता विधान परिषदेत आमदारांची पूर्णपणे काळजी घेतली जात आहे. अपक्ष आमदारांसह (Independent MLA) लहान पक्षांच्या नेत्यांचीही मनधरणी सुरु आहे. याच प्रयत्नात आज भाजप नेत्यांनी बहुजन विकास आघाडीचे नेते व आमदार हितेंद्र ठाकूर यांची भेट घेतली. विशेष म्हणजे हितेंद्र ठाकुरांच्या (Hitendra Thakur) भेटीसाठी भाजप नेते प्रवीण दरेकर आणि गिरीश महाजन हे लोकल मधून गेले. वेळेची बचत करण्यासाठी लोकलने प्रवास केल्याचं भाजप नेत्यांनी सांगितलं.

चर्चगेट ते विरार प्रवास

विधान परिषद निवडणुकीत प्रवीण दरेकर हे स्वतः उभे आहेत. प्रवीण दरेकर आणि गिरीश महाजन यांनी दुपारी तीन वाजेच्या सुमारास लोकलने प्रवास सुरु केला. चर्चगेटवरून त्यांनी सव्वा तीन वाजताची विरार लोकल पकडली. भाजप नेत्यांना अशा प्रकारे लोकलने प्रवास करताना पाहून बघ्यांची गर्दी रेल्वे स्थानकावर जमली होती.

बहुजन विकास आघाडीची तीन मतं महत्त्वाची

राज्यसभा निवडणुकीत मतदानाच्या दिवशी दुपारपर्यंत बहुजन विकास आघाडीच्या आमदारांनी कुणाला मतदान करणारे, हे गुलदस्त्यात ठेवलं होतं. महाविकास आघाडीनं एवढी मनधरणी केल्यानंतरही त्यांचं मत भाजपकडे गेल्याचा आरोप संजय राऊतांनी केला होता. आता विधान परिषद निवडणुकीत हितेंद्र ठाकूर आणि क्षितिज ठाकूर आणि राजेश पाटील या तीन आमदारांची मते कुणाला पडतात, यासाठी पक्षांची रस्सीखेच सुरु आहे. काँग्रेसचे दोन्ही उमेदवार निवडून येण्यासाठी 10 मते कमी पडत आहेत. त्यामुळे मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष व उमेदवार भाई जगताप यांनी मंगळवारी सायंकाळी हितेंद्र ठाकूर यांच्या कार्यालयाला भेट दिली. तसेच भाजप आमदार मनीषा चौधरी यांनीही ठाकूर यांची बुधवारी भेट घेतली. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेचे उमेदवार रामराजे निंबाळकर यांनीही ठाकूरांची भेट घेतली. दरम्यान, विविध राजकीय कामांसाठी या भेटी असल्याचं हितेंद्र ठाकुरांनी सांगितलं.