ना पंकजा मुंडे, ना सुरेश धस, विधानपरिषद विरोधी पक्षनेतेपदी प्रवीण दरेकर यांची निवड
शिवसेना व्हाया मनसेतून भाजपमध्ये आलेले प्रवीण दरेकर (Pravin Darekar opposition leader) यांची विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी वर्णी लागली आहे.
मुंबई : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विधानसभेचे विरोधी पक्षनेते (Pravin Darekar opposition leader) झाल्यानंतर, भाजपकडून विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदाची माळ कोणाच्या गळ्यात घालणार याकडे सर्वांचं लक्ष होतं. सर्वात आधी या शर्यतीत माजी मंत्री पंकजा मुंडे यांचं नाव चर्चेत होतं. त्यानंतर भाजप आमदार सुरेश धस, सूरजीतसिंह ठाकूर यांची नावंही चर्चेत होती. मात्र शिवसेना व्हाया मनसेतून भाजपमध्ये आलेले प्रवीण दरेकर (Pravin Darekar opposition leader) यांची विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी वर्णी लागली आहे.
नागपुरातील हिवाळी अधिवेशनाला आज 16 डिसेंबरपासून सुरुवात झाली आहे. हे अधिवेशन केवळ 6 दिवस चालणार आहे. या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर प्रवीण दरेकर यांची विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्यात आली.
कोण आहेत प्रवीण दरेकर?
- प्रवीण दरेकर हे भाजपचे विधान परिषदेचे विद्यमान आमदार आहेत.
- प्रवीण दरेकर हे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीतील आणि विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जातात
- मनसेमध्ये असताना दरेकर हे राज ठाकरे यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जात होते
- मनसेकडून निवडणूक लढताना 2014 च्या विधानसभा निवडणुकीत दरेकर यांचा मागाठाणे विधानसभा मतदारसंघातून पराभव झाला.
- त्यानंतर दरेकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपने त्यांना विधानपरिषदेवर पाठवून आमदार केलं.
फडणवीस आणि दरेकर
भाजपकडून विरोधी पक्षनेतेपदाची धुरा आता देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांच्याकडे असेल. देवेंद्र फडणवीस हे विधानसभेत तर प्रवीण दरेकर हे विधानपरिषदेत आपला आवाज घुमवतील.
विधानपरिषदेतील पक्षनिहाय संख्याबळ/ पक्षीय बलाबल
एकूण जागा – 78
- भाजप- 22
- शिवसेना- 12
- राष्ट्रवादी- 14
- काँग्रेस- 13
- अपक्ष- 06
- लोकभारती- 01
- शेकाप-01
- पीरिपा- 01
- रासप- 01
- रिक्त- 07
- एकूण – 78
मी सावकर टोप्या घालून आमदारांचं आगमन
विधिमंडळाचे आजपासून (सोमवार 16 डिसेंबर) सुरु होणारे हिवाळी अधिवेशन (Nagpur Winter Session) शेतकरी, स्वातंत्र्यवीर सावरकर यासारख्या मुद्यांवरुन गाजण्याचे संकेत आहेत. भाजप आमदार आक्रमक पवित्रा घेत सभागृहात ‘मी सावरकर’चा नारा घुमवणार आहेत. पुढील सहा दिवस चालणाऱ्या अधिवेशनात ऐन थंडीत वातावरण तापण्याची शक्यता नाकारता येत नाही.
भाजपचे सर्व आमदार भगव्या रंगाच्या ‘मी सावरकर’ लिहिलेल्या टोप्या घालून विधानभवनात आले आहेत. सावरकरांच्या मुद्द्यावर शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा भाजपचा डाव आहे. सावरकरांच्या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेत भाजप सभागृहाचं कामकाज बंद पाडण्याची शक्यता आहे.