मनसेला सोबत घेण्याचे प्रयत्न, बाळासाहेब थोरातांचे मोठं वक्तव्य
येत्या निवडणुकीत वंचित, मनसेसह इतर समविचारी पक्षांना एकत्रित घेण्यास प्रयत्न करणार असल्याचे वक्तव्य बाळासाहेब थोरात यांनी टीव्ही 9 मराठीला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीमध्ये केले.
मुंबई : काँग्रेसमध्ये राजीनामा नाट्यानंतर काल (13 जुलै) महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांची निवड करण्यात आली. महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदाची सूत्र हाती घेताच बाळासाहेब थोरात यांनी महाआघाडीचे संकेत दिले आहे. येत्या निवडणुकीत वंचित, मनसेसह इतर समविचारी पक्षांना एकत्रित घेण्यास प्रयत्न करणार असल्याचे वक्तव्य बाळासाहेब थोरात यांनी टीव्ही 9 मराठीला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीमध्ये केले.
गेल्या काही निवडणुकीत भाजप आणि शिवसेना युतीच्या निमित्ताने लोकशाहीला मोठा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीसह इतर पक्षाने एकत्रित यायला हवे. त्यासाठी आम्हाला ज्यांच्याशी चर्चा करण्याची गरज पडेल त्यांच्यासोबत चर्चा करु असे बाळासाहेब थोरात यांनी म्हटले.
“वंचितने जरी 288 जागांसाठी मुलाखतीची तयारी केली असली, तरी पक्ष म्हणून हे सर्व करणे योग्य आहे. पण आम्ही समविचारी, धर्मनिरपेक्ष असलेल्या पक्षांना एकत्रित करण्याचे प्रामाणिक प्रयत्न करणार आहोत असे प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झालेल्या बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांची भेट घेतली होती. त्यामुळे अनेक राजकीय चर्चांना उधाण आले होते. याबाबत तुमचे वैयक्तिक मत काय असा प्रश्न बाळासाहेब थोरात यांना विचारण्यात आला. त्याला उत्तर देताना थोरात यांनी “राज ठाकरेंनी लोकसभेत चांगली तयारी केली होती. त्यामुळे त्यांना बरोबर घ्यायचा की नाही याचा निर्णय वरिष्ठ पातळीवर घेतला जाईल. पण ज्या ठिकाणी आपल्याला मदत होत आहे, अशा सर्व समविचारी पक्षांना बरोबर घ्यावा असे मत त्यांनी व्यक्त केले.”
या मुलाखतीत त्यांनी काँग्रेसमधून बाहेर पडलेल्या नेत्यांवर निशाणा साधला. “जेव्हा कोणीही पक्षातून बाहेर पडत, तेव्हाच नव्या नेतृत्वाला संधी मिळते. काँग्रेसमध्ये लवकरच नवं नेतृत्व पुढे येईल असा माझा विश्वास आहे. तसेच काँग्रेसमध्ये मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचणारी अनेक व्यक्तिमत्त्व आहेत. तसेच राज्यात पुन्हा आघाडीचे सरकार येईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.”
मी आतापर्यंत काँग्रेसमध्ये अनेक चढउतार पाहिले आहेत, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर पक्षाने माझ्यावर मोठी जबाबदारी दिली आहे. त्यानुसार येत्या निवडणुकीत मी कार्यकर्त्यांमध्ये विश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न करेन असेही त्यांनी यावेळी सांगितले. तसेच त्याने येत्या काळात शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यावर भर देणार असल्याचेही सांगितले.
तसेच त्यांनी माजी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचेही कौतुक केले. “अशोक चव्हाणांनी चांगलं काम केलं आहे. येत्या दोन तीन महिन्यात निवडणुका आहेत. आम्हाला कमी वेळात कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचायचे आहेत. त्यादृष्टीने आम्ही लवकरच कार्यकर्त्यांना सोबत घेऊन काम करणार आहोत. असेही त्यांनी यावेळी म्हटलं.”