मनसेच्या 9 फेब्रुवारीच्या मोर्चाचा नवा मार्ग!
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या 9 फेब्रुवारीच्या आझाद मैदानावरील मोर्चाचा मार्ग (MNS March Route) अखेर ठरला आहे. त्यात काहीसा बदल झाला असून हा मोर्चा गिरगाव चौपाटीपासून निघेल.
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या 9 फेब्रुवारीच्या आझाद मैदानावरील मोर्चाचा मार्ग (MNS March Route) अखेर ठरला आहे. त्यात काहीसा बदल झाला असून हा मोर्चा गिरगाव चौपाटीपासून निघेल. याआधी मोर्चाचा मार्ग मुंबईतील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानापासून (भायखळा) आझाद मैदानापर्यंत ठरवण्यात आला होता (MNS March Route). मात्र, मुंबई पोलिसांनी भायखळ्यातून मोर्चा काढण्यास नकार दिल्याने हा बदल केल्याचं सांगण्यात येत आहे.
मनेसेच्या मोर्चाला परवानगी देण्याच्या मुद्द्यावर स्वतः गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही आपली भूमिका स्पष्ट केली होती. अनिल देशमुख म्हणाले होते, “राज ठाकरे यांनी मोर्चाला परवानगी मागितली आहे. त्यांना कोणत्या ठिकाणी परवानगी पाहिजे. यावर सर्व गोष्टींचा विचार करुन आम्ही निर्णय घेऊ. कायदा सुव्यवस्थेला कुठेही गालबोट लागायला नको, याचा सर्व विचार करुन त्यांना परवानगी देऊ.”
भारत माझा देश आहे! #मनसे_महामोर्चा pic.twitter.com/aUst3XCEJz
— MNS Adhikrut (@mnsadhikrut) February 3, 2020
दरम्यान, राज ठाकरे यांनी पक्षाच्या पहिल्या ऐतिहासिक अधिवेशनात नागरिकत्व सुधारणा कायद्याला (CAA) विरोध करणाऱ्यांच्या मोर्चाला मोर्चानं उत्तर देण्याची भाषा केली होती. त्यासाठी 9 फेब्रुवारीला आझाद मैदानावर मोर्चा काढण्याचीही घोषणा राज ठाकरेंनी केली. विशेष म्हणजे सुरुवातीला हा मोर्चा सीएएला समर्थन करण्यासाठी असल्याचं बोललं गेलं. त्यामुळे सीएए आणि एनआरसीला पाठिंबा देण्यावरुन मनसे पदाधिकाऱ्यांमध्येही गोंधळ होता. त्यानंतर राज ठाकरेंनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांच्या शंकांचं निरसन केलं आणि आपली भूमिका स्पष्ट केली.
मनसेचा मोर्चा हा ‘नागरिकत्व सुधारणा कायदा’ अर्थात ‘सीएए’ किंवा ‘राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी’ म्हणजे ‘एनआरसी’च्या समर्थनार्थ नसल्याचं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सांगितलं. तसेच हा मोर्चा पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोरांच्या विरोधात असल्याचं नमूद केलं.
देशाच्या इतर भागातून लोक देशात सरळ घुसखोरी करतात. त्यामुळे आपल्याला इतर देशांप्रमाणे कठोर व्हायला हवं. म्हणून पहिल्यांदा या देशात आलेले बांग्लादेशी आणि पाकिस्तानी मुस्लिम बाहेर काढले पाहिजेत. यासाठी माझा केंद्राला पूर्ण पाठिंबा आहे, असं मत राज ठाकरे यांनी पक्षाच्या पहिल्या अधिवेशनातील भाषणात व्यक्त केलं होतं.
MNS March Route