अक्षय मंकणी, मुंबईः महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) दरवेळी नवं आंदोलन छेडते आणि मॅनेज होते, असा आरोप केला जातो. याला मनसेच्या वतीनं मोठं प्रत्युत्तर देण्यात आलंय. मुंबईतील चांदिवली भागात मनसेनं एक मोठं बॅनर (Banner) लावलंय. त्यावर आतापर्यंतच्या आंदोलनात काय भूमिका घेतली आणि ते कसं यशस्वी केलं, याचं वर्णन केलंय. 10 बाय 100 फुटांचं हे बॅनर आहे. मनसेनं कोणतंही आंदोलन अर्धवट सोडलेलं नाही, असं चांदिवलीचे विभागाध्यक्ष महेंद्र भानुशाली (Mahendra Bhanushali) यांनी वक्तव्य केलंय.
रक्ताने तर फक्त वारसदार ठरतो. पण वारसा विचाराने चालतो, असं वाक्य या बॅनरवर ठळक अक्षरात लिहिलंय. तसेच काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत युती करणाऱ्या उद्धव ठाकरेंबाबत महाराष्ट्राच्या जनतेला टिचभरही सहानुभूती उरलेली नाही, असा संदेश या बॅनरवर देण्यात आलाय.
टीव्ही 9 च्या प्रतिनिधींशी महेंद्र भानुशाली यांनी संवाद साधला. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली. ते म्हणाले, मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे यांनी अप्रचार केला होतं. मनसे फक्त आंदोलनं अर्धवट सोडतो, मॅनेज होते… असं म्हटलं.
मला सांगा हे 9 मुद्दे लिहिले. कुठे मॅनेज झालो सांगा. 65 टोलनाके बंद केलं. असे खूप मुद्दे लिहिले आहेत… भोंग्याचं आंदोलन झालं. हिंदु मुलांवर तुम्ही तडीपारी लावली. आम्ही आमच्या घरावर हनुमान चालिसासाठी भोंगा लावला होता. पण मुस्लिमांचं लांगुलचालन करण्यासाठी तुम्ही हिंदुंना तडीपार केलं? असा सवाल भानुशाली यांनी केला.
कंगना रानौतने थोडं काही बोललं, तिचं घर तोडलं, वडाळ्यात एका महिला-पुरुषाचे केस कापले, पालघरमध्ये साधु हत्याकांड झालं, तुम्ही काय केलं अडीच वर्षात? तुम्ही याकुब मेमन आतंकवादीची कबर सजवली? असा सवाल भानुशाली यांनी केलाय.
आज एअरटेलममध्ये हा फोन व्यस्त आहे… असं मराठीत ऐकू येतं, ते राज ठाकरेंमुळे झाल्याचं भानुशाली म्हणाले. यापुढच्या सगळ्या निवडणुका स्वबळावर लढणार आहोत, त्यामुळे राज ठाकरे यांचं… मनसेचं काम आम्ही इथे बॅनरवर लावल्याचं मनसे नेत्याने सांगितलं.