इकडे युतीची चर्चा, तिकडे विक्रोळीत मनसेचा शिधा वाटपाचा फॅक्टचेक
आज विक्रोळी येथील मनसैनिकांनी रेशन दुकानात फॅक्टचेक केला. 800 नागरिकांसाठी येथे शिध्याची पाकिटं उपलब्ध झाली आहेत. मात्र थमप्रिंट करून रेशन दिलं जातं, ते मशीनच बंद असल्याचं दिसून येतंय.
मुंबईः एकिकडे एकनाथ शिंदे-भाजप (Eknath Shinde- BJP) सरकारसोबत मनसेची (MNS) युती होणार असल्याच्या जोरदार चर्चा रंगल्या असताना विक्रोळीत दुसरंच चित्र दिसंतय. येथील मनसैनिकांनी शिधा वाटप योजनेचा रिअॅलिटी चेक केलाय. सरकारच्या या योजनेची ग्राउंड रिअॅलिटी काय आहे, हे पहायला मनसेचे कार्यकर्ते पोहोचले. विक्रोळीतील (Vikroli) रेशनच्या दुकानावरचं मशीन बंद असलेलं दिसून आलं.
यंदाच्या दिवाळीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रेशनकार्ड धारकांसाठी 100 रुपयात चार वस्तू देण्याची योजना जाहीर केली आहे. यात रवा, साखर, बेसन आणि 1 किलो पाम तेल या चार गोष्टींचा समावेश आहे.
आनंदाचा शिधा असं याला म्हटलं जातंय. या शिध्यामुळे गोरगरीबांना दिवाळी साजरी करणं सोपं जाईल, असा सरकारचा यामागील उद्देश आहे.
मात्र राज्यातील अनेक भागात हा शिधा पोहोचलाच नाही. सरकारने गरीबांची ही थट्टा चालवली आहे, असा आरोप विरोधकांकडून केला जातोय.
पाहा मनसेचा फॅक्टचेक—
आज विक्रोळी येथील मनसैनिकांनी रेशन दुकानात फॅक्टचेक केला. 800 नागरिकांसाठी येथे शिध्याची पाकिटं उपलब्ध झाली आहेत. मात्र थमप्रिंट करून रेशन दिलं जातं, ते मशीनच बंद असल्याचं दिसून येतंय.
नागरिकांना हे किट न मिळाल्यानं त्याचा जाब विचारण्यासाठी मनसे नेते येथे आलेत. दुकानदार म्हणाले, दोन दिवसांपासून माल आलाय. पण सर्व्हर बंद असल्याने आम्ही काहीही करू शकत नाहीत… अधिकाऱ्यांना विचारलं असता त्यांनीही सर्व्हर चालू होईपर्यंत काही करता येणार नाही, असं म्हटल्याचं दुकानदारांनी सांगितलं.