वरळीमध्ये एक पत्र व्हायरल होतय. त्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवाराला पाठिंबा दिल्याचा मजूकर आहे. आज विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत असताना हे पत्र व्हायरल झालय. त्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे बोलले आहेत. मतदानाचा हक्क बजावल्यानंतर राज ठाकरे पत्रकारांशी बोलले. “मूळात ज्यांच्या पायाखालची जमीन सरकलेली असते, निवडून येण्याच सोडा, पण ज्यांना मत मिळण्याचा विश्वास नसतो, ते अशा गोष्टी करतात. वरळीतील मतदार सूज्ञ आहे. मी असा कोणताही पाठिंबा शिवसेना शिंदे गटाला दिलेला नाही. मतदारांनी यावर विश्वास ठेऊ नये. ही गोष्ट खोटी आहे” असं राज ठाकरे म्हणाले.
निवडणुकीत खूप ओंगळवाणे प्रकार बघायला मिळत आहेत, या पत्रकाराच्या प्रश्नावर राज ठाकरे म्हणाले की, “भयंकर, मी गुढी पाडव्याच्या सभेत आधीच सांगितल होतं की, या निवडणुकीत खूप गोंधळ होतील. विचित्र गोष्टी दिसतील, तसच होतय. कुठल्या गोष्टीचा कोणाला अंदाज येत नाहीय, असे प्रकार करुन काही होणार नाही. बाकीच्यांनी जी माती खायची ती पाच वर्षात खाऊन झाली. लोकं आता भुलणार नाहीत” या निवडणुकीत पैशांचा वापर होतोय यावर राज ठाकरे म्हणाले की, ‘आता जास्त उघडणपणे होतोय’
‘आज कोणीही ठामपणे सांगू शकत नाही, की…’
मतदार मोठ्या संख्येने येत आहेत, युवा वर्ग मतदानाला बाहेर पडतोय, त्यावर ‘मतदानाची टक्केवारी वाढली पाहिजे’ असं राज ठाकरे म्हणाले. “ज्यांनी तुमच्या मताशी प्रतारणा केली, त्यांना शिक्षा दिली पाहिजे. विनोद तावडेंच्या प्रकरणात डिटेल माहिती नाही. कोणतरी कायतरी बोलतं, माहिती घेऊन बोलेन” असं म्हणाले. नेत्यांवर हल्ले होत आहेत, त्यावर राज ठाकरे म्हणाले की, “नेत्यांनी लोकांचा विश्वास गमावला आहे. आज कोणीही ठामपणे सांगू शकत नाही, की गेल्या निवडणुकीत हा कुठे होता, आता कुठे आहे. अशा दल बदलू राजकारणावर लोकांचा राग असणार”