MNS : मनसेची महत्त्वाची बैठक, राज ठाकरेंच्या उपस्थितीत महापालिका निवडणुकीची रणनिती ठरणार
राज्यातील आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची (MNS) राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मुंबईत बैठक आयोजित करण्यात आली आहे.
मुंबई: राज्यातील आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची (MNS) राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मुंबईत बैठक आयोजित करण्यात आली आहे. मुंबईच्या एमआयजी क्लब इथ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना बोलवण्यात आले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होत असून या बैठकीकडे राज्यातील मनसे सैनिकांचं लक्ष लागलं आहे. आगामी महापालिका निवडणुकीत (Municipal Corporation Election) मनसे आणि भाजपची युती होणार का याबाबत देखील आजच्या बैठकीत चर्चा होणार असल्याचं कळतंय. एमआयजी क्लबमध्ये सुरु असलेल्या बैठकीला मनसे आमदार राजू पाटील, अमित ठाकरे, अविनाश अभ्यंकर, नितीन सरदेसाई, संदीप देशपांडे यांच्यासह मनसेचे महत्त्वाचे पदाधिकारी उपस्थित आहेत.
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठक
राज्यातील महानगरपालिकेच्या निवडणुकीची तयारी आणि रणनिती संदर्भात मनसेची बैठक बोलावण्यात आलेली आहे. मुंबई , पुणे , पिंपरी चिंचवड , ठाणे येथील पक्ष पदाधिकाऱ्यांना बैठकीला उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले होते. राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मनसेकडून आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या रणनीतीवर चर्चा केली जाणार आहे.
राज ठाकरेंच्या उपस्थितीत बैठक सुरु
राज ठाकरे आजच्या बैठकीत आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसे पदाधिकाऱ्यांना कोणते आदेश देणार याकडे लक्ष लागलं आहे. मनसेची नाशिकच्या महापालिकेत सत्ता होती. त्यामुळं मुंबई प्रमाणं आगामी काळात मनसे नाशिकच्या निवडणुकीकडे लक्ष देण्याची शक्यता आहे.
मनसे भाजप युती होणार का?
राज ठाकरे यांनी गेल्या सहा महिन्यांमध्ये पुणे आणि नाशिकचे दौरे केले होते. पुणे आणि नाशिकच्या दौऱ्यावर असताना राज ठाकरे यांनी तेथील स्थितीचा आढावा घेतला होता. मुंबई महापालिका निवडणूक देखील मनसेसाठी महत्त्वाची आहे. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्या महाविकास आघाडी विरोधत लढण्यासाठी मोठ्या पक्षासोबत युती असावी, अशी भूमिका पक्षाच्या काही कार्यकर्त्यांची असल्यानं आजच्या बैठकीत मनसे आणि भाजपच्या युतीवर निर्णय होणार का हे पाहावं लागणार आहे. राज ठाकरे आणि चंद्रकांत पाटील यांची नाशिकमध्ये भेट झाल्यानं त्यावेळी देखील युतीच्या चर्चा रंगल्या होत्या.
जिंकण्यासाठी लढायचं
आगामी महापालिका निवडणुका जिंकण्यासाठी लढायच्या असल्याचं मत अनेक मनसे कार्यकर्त्यांचं आहे. मनसेच्या कार्यकर्त्यांनी कोरोना काळात चांगलं कामं केलं होतं. त्यामुळं मुंबईसह नाशिक, ठाणे आणि पुणे महापालिका निवडणुकीत जिंकण्यासाठी लढायचं अशी भावना मनसेच्या कार्यकर्त्याची आहे. मनसे सैनिक आणि पदाधिकाऱ्यांनी राज ठाकरे काय संदेश देणार हे पाहावं लागणार आहे.
इतर बातम्या:
MNS Chief Raj Thackeray conduct MNS party office bearers of Mumbai Pune Nashik Thane for upcoming Municipal Corporation Election