पुणे : राज ठाकरे (Raj Thackeray) यांची पुण्यात आज सभा झाली. या सभेत राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा विरोधकांवर जोरदार निशाणा साधला. या सभेत राज ठाकरे यांनी राणा दाम्पत्य आणि शिवसेना (Shiv Sena) नेते संजय राऊत यांच्यावर देखील जोरदार टीका केली आहे. संजय राऊत यांच्यावर टीका करताना राज ठाकरे यांनी राज्यात एक दुसऱ्याच्याविरोधात उभे ठाकलेले राणा दाम्पत्य आणि संजय राऊत (Sanjay Raut) लडाखमध्ये सोबत जेवताना कसे दिसले असा सवाल उपस्थित केला आहे. पुढे बोलताना राज ठाकरे म्हणाले मी सांगितले होते की जर मशिदीवर लावण्यात आलेल्या भोंग्याचा आवाज मर्यादेबाहेर असेल तर तुम्ही तिथे हनुमान चालिसा लावा. मग नवनीत राणा आणि रवि राणा यांना हनुमान चालिसा म्हणण्यासाठी मातोश्रीवर का जायचे होते? मातोश्री काय मशिद आहे का? यावरून शिवसेना आणि राणा दाम्पत्य यांच्यामध्ये जोरदार राडा झाला. मात्र एवढा राडा झालानंतर देखील राणा दाम्पत्य लडाखमध्ये त्यांच्यासोबत जेवताना दिसते. हे सर्व ढोंगी आहेत. यांचं हिंदुत्व केवळ पकपकपक एवढंच असल्याची टीका ठाकरे यांनी केली आहे.
हे सर्व राजकारण सुरू आहे. तुम्ही हे राजकारण समजून घ्या. ज्यांना हिंदूत्त्व झोंबलं, लाऊडस्पीकर झोंबले ते सर्व आपल्याविरोधात एकत्र आले. हे फक्त दाखवण्यापुरते आपसात भांडत असतात. साधी गोष्ट आहे. हनुमान चालीसेवरून एवढा गोंधळ झाला. राणा दाम्पत्याला मातोश्रीसमोर हनुमान चालीसा वाचायची होती. मोतोश्री काय मशिद आहे का? मग त्यावरून शिवसेना आणि राणा दाम्पत्यामध्ये झालेला राडा सर्व राज्याने पाहिला. नको ते आरोप करण्यात आले. मात्र त्यानंतर तेच राणा दाम्पत्य आणि संजय राऊत हे लडाखमध्ये एकत्र जेवताना दिसून आले. एकत्र फिरताना दिसून आले. याचे शिवसैनिकांना काहीच वाटत नाही का? असा सवाल राज ठाकरे यांनी केला आहे.
दरम्यान या सभेत राज ठाकरे यांनी शरद पवारांवर देखील निशाणा साधला आहे. राज ठाकरे यांनी आज सभागृहात का सभा घेतली यावरून विविध तर्कवितर्क लावले जात होते. यावेळी सध्या पावसाळी वातावरण आहे, त्यामुळे खबरदारी म्हणून सभा इथे आयोजित केल्याचे राज ठाकरे यांनी म्हटले. दरम्यान याचवेळी राज ठाकरे यांनी शरद पवारांना देखील टोला लगावला. सध्या कोणत्याही निवडणुका नाहीत त्यामुळे उगच पावसात भिजण्याची गरज नसल्याचे राज ठाकरे यांनी यावेळी म्हटले आहे.