पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तीन दिवसीय पुणे दौरा केवळ दोनच दिवसात आटोपता घेतला. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी हालचाली वेगवान केल्या आहेत. त्यामुळे पुण्यातील दौऱ्याला अत्यंत महत्त्व आलं होतं.
राज ठाकरे यांनी दोन दिवसात जवळपास 950 पदाधिकऱ्यांशी संवाद साधला. या आढावा बैठकीत राज ठाकरे यांनी पुण्यातील आठ विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेतला.
पिंपरी आणि जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक 15 जूननंतर घेणार आहेत, अशी माहिती मनसेमधील सूत्रांनी दिली.
पुण्यात पदाधिकाऱ्यांशी संवाद साधण्याआधी सर्व पदाधिकाऱ्यांचे मोबाईल गेटवरच जमा करण्यात आले होते. या गोष्टीची दोन दिवसांपूर्वीच प्रचंड चर्चा झाली होती.
मनसेने लोकसभा निवडणुकीत एकही उमेदवार उभा केला नव्हता. मात्र, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ‘मोदी शाह मुक्त भारत’ म्हणत राज्यात एकूण दहा प्रचारसभा घेतला आणि प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या काँग्रेस-राष्ट्रवादीला मतदान करण्याचं आवाहन केलं होतं. मात्र, आता दोन ते तीन महिन्यात विधानसभा निवडणुका येऊन ठेपल्या आहेत. विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे यांचा मनसे पक्ष मोठ्या ताकदीने उतरणार आहे. त्याच दृष्टीने राज ठाकरे यांनी दौरे, बैठका, चर्चा इत्यादी गोष्टींच्या हालचाली वाढवल्या आहेत.