मुंबई :राजकीय भूकंपात महत्त्वाची आणखी एक घडामोड समोर आली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray Tweet) यांनी ट्वीट केलं. ट्वीट द्वारे त्यांनी आपल्या ऑपरेशनबाबत (Raj Thackeray Operation) माहिती दिली. शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याची माहिती देताना आपण आता घरी परतलो आहोत, असंही राज ठाकरेंनी (Raj Thackeray News) म्हटलंय. शनिवारी त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे हे लिलावती रुग्णालयात दाखल होते. शस्त्रक्रियासाठी त्यांना रुग्णालयात ठेवण्यात आलं होतं. राज ठाकरेंच्या हिप बोनचं ऑपरेशन लिलावती रुग्णालयात करण्यात आलं होतं. राज ठाकरेंच्या चाहत्यांनी त्यांच्या प्रकृतीसाठी देवाकडेही साकडं घातलं होतं. अखेर राज ठाकरे ही ठणठणीत बरे होऊन आता घरी परतले आहे. त्यांनी स्वतः ट्वीट करत याची माहिती दिलीय.
घरी परतलेल्या राज ठाकरेंनी अजूनही सध्याच्या राजकीय भूकंपावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र मनसे नेत्यांकडून मात्र शिवसेनेवर निशाणा साधण्यात आलाय. मनसे नेते गजानन काळे यांनी ट्वीट करत शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केलीये. तर दुसरीकडे रत्नागिरी जिल्ह्यातील मनसेचं पोस्टर सगळ्यांचं लक्ष वेधून घेत होते. आता राज ठाकरे सध्याच्या राजकीय घडामोडींवर काय भाष्य करतात, हे पाहणं महत्त्वाचंय.
राज ठाकरेंवर जून महिन्याच्या सुरुवातीलाच खरंतर शस्त्रक्रिया केली जाणार होती. मात्र कोरोनाची लागण झाल्यामुळे राज ठाकरेंवरील शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आली. अखेर आता त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली असून ते पुन्हा बरे होऊन घरी परतले आहेत. डॉक्टरांना त्यांना सध्या आराम करण्याचा सल्ला दिला आहे.