औरंगाबादचं नामांतर संभाजीनगर करा! शिवसेनेची भूमिका मनसेकडून हायजॅक
औरंगाबाद महापालिका निवडणुकांच्या तोंडावर 'संभाजीनगर'चा मुद्दा तीव्र होणार आहे.
औरंगाबाद : ‘औरंगाबाद’ की ‘संभाजीनगर’ या वादात आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनाही उडी घेणार आहे. औरंगाबादचं नाव संभाजीनगर करण्याची मागणी मनसेने केली आहे. मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील शहराच्या नामांतराची मागणी विधानसभेत (MNS Demands renaming Auranagabad ) करणार आहेत.
‘औरंगाबाद शहराचं नाव बदलण्यासाठी मनसे सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे. आमदार राजू पाटील विधानसभेत तसा प्रस्ताव मांडतील’, अशी माहिती मनसे नेते अभिजीत पानसे यांनी ‘टीव्ही9 मराठी’ला दिली. हिंदूत्ववादी भूमिकेकडे झुकलेल्या मनसेने शिवसेनेची भूमिकाही हायजॅक करण्याच्या हालचाली सुरु केल्याचं दिसत आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा मराठवाडा दौरा आयोजित करण्यात आला आहे. दौऱ्याच्या नियोजनासाठी राजू पाटील आणि अभिजित पानसे औरंगाबाद शहरात कालच दाखल झाले आहेत. राज ठाकरे यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद शहरात पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती.
औरंगाबाद महापालिका निवडणुकांच्या तोंडावर ‘संभाजीनगर’चा मुद्दा तीव्र होताना दिसत आहे. शिवसेनेच्या नेत्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबर महाविकास आघाडी केल्याने त्यांचं हिंदुत्व सौम्य झाल्याचा आरोप भाजपचे नेते करत आहेत. औरंगाबाद शहराचं नाव संभाजीनगर करावं, ही मागणी शिवसेनेने जवळपास 30 वर्षांपासून उचलून धरली आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी नामांतराचं स्वप्न पाहिलं होतं. आता भाजपनेही या मागणीवर जोर दिला आहे.
हेही वाचा : वाड्या-वस्त्यांची जातिवाचक नावं बदलणार, पवारांच्या आदेशाने धनंजय मुंडेंची पावलं
मनसेनेही आता औरंगाबाद महापालिका निवडणुकांमध्ये उतरण्याचं ठरवलं आहे. 50 हून अधिक जागा लढवण्याच्या तयारीत असलेली मनसे संभाजीनगरचा मुद्दा उचलून धरण्याची चिन्हं आहेत.
कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी मनसेमध्ये पुन्हा प्रवेश घेतला आहे. त्यांच्यासोबत शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांचे विश्वासू सहकारी सुहास दशरथे यांनीही 38 वर्षांनी सेनेची साथ सोडत मनसेचा हात धरला आहे. त्यातच मनसे-भाजप युतीच्या चर्चा रंगल्या आहेत. मनसेने घेतलेल्या नव्या भूमिकेमुळे औरंगाबादेत पक्षाला बळ मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. (MNS Demands renaming Auranagabad)