नवी मुंबई : मुंबईची लाईफलाईन अर्थातच मुंबई लोकल लवकर सुरु करा, या मागणीसाठी मनसेकडून सविनय कायदेभंग आंदोलन करण्यात आलं होतं. या आंदोलनादरम्यान लोकलने प्रवास करणाऱ्या मनसेच्या काही नेत्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे, मनसे नेते संतोष धुरी, गजानन काळे, अतुल भगत यांचा समावेश आहे. या सर्वांना अटक करण्यात आली असून 14 दिवसांची न्यायलयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. (Police Filed crime on MNS Leader For Local Protest)
कर्जत रेल्वे पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर या नेत्यांना अटक करण्यात आली. याप्रकरणी मनसेच्या चारही नेत्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यामुळे संदीप देशपांडे, संतोष धुरी, गजानन काळे, अतुल भगत यांना 6 ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत राहावं लागणार आहे. हे सर्व नेते पुन्हा जामिनासाठी अर्ज दाखल करणार आहे.
संदीप देशपांडे यांनी ‘टीव्ही 9 मराठी’च्या माध्यमातून पोलिसांना कुठून कुठपर्यंत प्रवास केला हे शोधून दाखवावं, असा थेट इशारा पोलिसांना दिला होता. त्यानंतर पोलिसांनी त्यांनी सकाळी 7 च्यादरम्यान शेलू रेल्वे स्थानक ते नेरुळ रेल्वे स्थानक असा प्रवास केल्याचं शोधून काढलं होतं. त्यानुसार शासनाच्या आदेशाचे उल्लंघन, विना तिकीट प्रवास तसंच रेल्वे अधिनियम कलम 147, 153, 156 अन्वये कर्जत रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
“आम्हाला अजून अटक झालेली नाही. आम्ही स्वत: पोलिसांना शरण जात आहोत. प्रवास केला म्हणून अटक होते ही देशाच्या इतिहासातील पहिली घटना असावी, अन्यथा दंड देऊन सोडलं जातं. सरकारचा किती आकस आहे, हे यातून दिसून येतं. आंदोलन हे प्रतिकात्मक होतं. ते फक्त सरकारचं लक्ष वेधण्यासाठी होतं. त्यावर सरकार चर्चा करायला तयार नाही. आमच्यावर तुमचा राग आहे तर मग रेल्वे प्रवासी संघटनांसोबत चर्चा करा. पण आंदोलन करु नये म्हणून ही सर्व हुकुमशाही सुरु आहे. लोकशाहीत चर्चा होऊन मार्ग काढले जातात, डोक्यावर बंदुका ठेवून मार्ग काढले जात नाहीत,” अशी प्रतिक्रिया संदीप देशपांडे यांनी पोलिसांना शरण झाल्यानंतर दिली.
मुंबई लोकल सुरु करा या मागणीसाठी मनसे काल (22 सप्टेंबर) रस्त्यावर उतरली होती. यावेळी मनसेकडून सविनय कायदेभंग करत विनापरवाना लोकलमधून प्रवास करण्यात आला. यावेळी रेल्वे पोलिसांना गुंगारा देत मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे, माजी नगरसेवक संतोष धुरी यांनी लोकलमधून प्रवास केला होता. तसेच संतोष धुरी, गजानन काळे, अतुल भगत या मनसे नेत्यांनीही रेल्वे प्रवास केला होता.
“सर्वसामान्यांसाठी रेल्वे सुरु करा, अशी विनंती अनेक वेळा सरकारला केली होती. लोकांचे प्रचंड हाल होत आहेत. बसमध्ये कोरोना पसरत नाही, रेल्वेमध्ये पसरतो असा सरकारचा समज झाला असावा. आज आम्ही कायदेभंगाची हाक दिली होती. त्याप्रमाणे आज नाकावर टिच्चून आम्ही हा रेल्वे प्रवास करत आहोत,” अशी प्रतिक्रिया मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी या रेल्वे प्रवासादरम्यान टीव्ही 9 मराठीशी बोलताना दिली होती.(Police Filed crime on MNS Leader For Local Protest)
संबंधित बातम्या :
‘मुंबई लोकलवर आंदोलन करुन राजकारण करु नका’, अनिल परब यांची मनसेवर टीका
MNS protest | मनसेचा सविनय कायदेभंग, संदीप देशपांडेंचा लोकल प्रवास
MNS Protest LIVE | पाच मिनिटं द्या, लोकल प्रवास करतो, मग गुन्हा दाखल करा : अविनाश जाधव