“तुला तुडवणारच… कुत्र्यासारखं मारणार”; मनसे नेत्याची अमोल मिटकरी यांना उघड धमकी
अजित पवारांनी जर तुम्हाला हात दिला नसता तर तुमची लायकी काय होती, हे अमोल मिटकरी यांनी लक्षात ठेवावं, असेही ते म्हणाले.
MNS Karnabala Dunbale On Amol Mitkari : राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा उल्लेख सुपारीबाज असा केला. या कारणामुळे मनसैनिक संतापले आहेत. याच पार्श्वभूमीवर मनसेच्या काही पदाधिकाऱ्यांकडून अमोल मिटकरींच्या गाडीची काच फोडण्याचा प्रयत्न करण्यात आला. या प्रकरणानंतर आता मनसे सरचिटणीस कर्णबाळा दुनबळे यांनी अमोल मिटकरींना उघड धमकी दिली. “तुला तुडवणार म्हणजे तुडवणारच, तुला कुत्र्यासारखा मारणार”, असे मनसे सरचिटणीस कर्णबाळा दुनबळे म्हणाले.
मनसे सरचिटणीस कर्णबाळा दुनबळे यांनी ‘टीव्ही 9 मराठी’शी संवाद साधला. यावेळी त्यांनी अमोल मिटकरी यांना उघडपणे धमकी दिली. तसेच त्यांनी “पळून जाणं आमच्या रक्तात नाही. आम्ही पळवणारी लोक आहोत”, असे मनसे सरचिटणीस कर्णबाळा दुनबळे यांनी म्हटले.
“तुमची लायकी काय?”
“आम्ही पोलीस आणि संविधानाला मानणारी लोक आहेत. अजित पवारांनी जर तुम्हाला हात दिला नसता तर तुमची लायकी काय होती, हे अमोल मिटकरी यांनी लक्षात ठेवावं. त्यानंतर आपण कोणाबद्दल बोलतो याचा विचार करावा. हे योग्य नाही”, असे कर्णबाळा दुनबळे म्हणाले.
“मी फरार आहे, असं तो अनेकदा म्हणतो. अमोल मिटकरींच्या तोंडाला मूळव्याध झालेला आहे. अमोल मिटकरी हा कुठेही काहीही भुंकत असतो. त्यामुळे या माणसाने किती बोलायचं हे आता त्यानेच ठरवायचं. आम्हाला नामर्दाची औलाद म्हणणाऱ्या अमोल मिटकरींच्या आईचा मी अपमान करणार नाही. पण आम्हाला बोलायचं तर आम्ही तुम्हाला तुमचं सांगा, असंही बोलू शकतो. आम्ही ते बोललो का?” असा प्रश्नही कर्णबाळा दुनबळे यांनी उपस्थित केला.
“तुला तुझी औकात दाखवली असती”
“जर आम्ही नामर्दाची औलाद असतो, तर तू काल टॉयलेटमध्ये जाऊन का लपला होतास? मी जर तिथे असतो तर तुला तुझी औकात दाखवली असती. तुझ्या राष्ट्रवादीच्या लोकांना मी कोण आहे हे विचार”, असेही कर्णबाळा दुनबळे म्हणाले.
“तुला तुडवणार म्हणजे तुडवणारच”
“मी तुला बोललो आहे तुला तुडवणार म्हणजे तुडवणारच. तुला कुत्र्यासारखा मारणार. हरामखोरासारखा बोलू नको. मर्यादा ठेव. मर्यादा पाळ. भाषेची मर्यादा सर्वांनी पाळावी. आम्ही कोणाच्या आई, बहीण किंवा वडीलधाऱ्यांबद्दल आम्ही बोलत नाही. ती आमची संस्कृती नाही. राज ठाकरेंनी आम्हाला ते शिकवलं नाही आणि पळून जाणं आमच्या रक्तात नाही. आम्ही पळवणारी लोक आहोत”, असेही कर्णबाळा दुनबळे यांनी सांगितले.