“आमच्या वर्गातला एक मुलगा अभ्यास करायचा नाही, पण नंबर वन यायचा, मुख्यमंत्र्यांचं तसंच आहे”
ज्यांच्या दोन लसी झाल्या त्यांना निर्बंधातून बाहेर काढा ही आमची मागणी आहे. लसीकरण झालं तरी निर्बंध असतील, तर लसीकरणाचा उपयोग काय? असा सवाल संदीप देशपांडे यांनी विचारला.
मुंबई : “आमच्या वर्गात एक मुलगा होता, तो अभ्यास करायचा नाही, पण तो वर्गात नंबर वन यायचा. एकतर तो खूप हुशार असेल किंवा मग कॉपी करुन किंवा मॅनेज करुन पास झाला असेल, असंच मुंख्यमंत्र्यांचं आहे” अशा शब्दात मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना टोला लगावला. देशातील 13 राज्यांमधून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नंबर वन ठरल्याचा अहवाल नुकताच समोर आला होता.
काय म्हणाले संदीप देशपांडे?
‘प्रश्नम’ या संस्थेने जाहीर केलेल्या त्रैमासिक अहवालात भारतातील 13 राज्यांमधून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अव्वल ठरले आहेत. त्यावर बोलताना संदीप देशपांडे म्हणाले, की “आमच्या वर्गात एक मुलगा होता, तो अभ्यास करायचा नाही, पण तो वर्गात नंबर वन यायचा. एकतर तो खूप हुशार असेल किंवा मग कॉपी करुन किंवा मॅनेज करुन पास झाला असेल, असंच मुंख्यमंत्र्यांचं आहे. नंबर एक असण्यासाठी काम करावं लागतं, दीड वर्षात काय केलं?” असा सवाल संदीप देशपांडे यांनी विचारला.
“आपसातली लफडी बाजूला ठेवा”
सरकारने जनतेच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये, वेठीस धरू नये. आपसातली लफडी बाजूला ठेवावी, रुग्णसंख्या कमी झाली आहे. जनतेला वेठीस का धरता? निर्बंध का उठवत नाही? असा प्रश्न संदीप देशपांडेंनी विचारला. विषय आक्रमक हेण्याचा नाही, सरकारला परिणाम भोगावे लागणार, मुख्यमंत्र्यांना पत्र दिलंय की रेल्वे सुरू करा, पण त्यांना घरातच बसून राहायचंय, अशी टीकाही देशपांडेंनी केली.
“निर्बंध असतील, तर लसीकरणाचा उपयोग काय?”
ज्यांच्या दोन लसी झाल्या त्यांना निर्बंधातून बाहेर काढा ही आमची मागणी आहे. लसीकरण झालं तरी निर्बंध असतील, तर लसीकरणाचा उपयोग काय? या सरकारने काय कामं केली? शाळेच्या फीचा प्रश्न आहे, व्यापारी नाराज आहेत, हे वसुली सरकार हफ्तेखेरी करतंय. दुकानं बंद, रेल्वे बंद, लोक घरात, वेठीस धरण्याचं काम होतंय, असंही संदीप देशपांडे म्हणाले.
दरम्यान, मुंबई महापालिका निवडणुकांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची तयारी सुरु आहे, अशी माहितीही देशपांडेंनी दिली. कोव्हिड काळात मनसेने केलेल्या कामाचा जनतेच्या मनावर मोठा परिणाम आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे स्वतः यामध्ये लक्ष देत आहेत, असंही संदीप देशपांडे यांनी सांगितलं.
संबंधित बातम्या :
Uddhav Thackeray : देशातील 13 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांमध्ये उद्धव ठाकरेच नंबर वन!
(MNS Leader Sandeep Deshpande taunts Maharashtra CM Uddhav Thackeray over chosen as Best CM among 13 states)