मुंबई: राज्यपालांना थेट भेटणे हा महाराष्ट्राचा अपमान आहे, असे वक्तव्य करणारे शिवसेना नेते संजय राऊत यांना मनसेकडून चोख प्रत्युत्तर देण्यात आले आहे. मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी संजय राऊत आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या भेटीदरम्यानचा एक फोटो ट्विट केला आहे. या फोटोत संजय राऊत हे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना वाकून कोपरापासून दंडवत घालताना दिसत आहेत. ‘महाराष्ट्राचा अपमान करताना खुद्द संजय राऊत’, अशी चपखल कॅप्शन संदीप देशपांडे यांनी फोटोच्यावरती लिहली आहे. त्यामुळे आता शिवसेनेच्या गोटातून या टीकेला कशाप्रकारे प्रत्युत्तर देण्यात येणार, हे पाहावे लागेल. ( MNS leader Sandeep Deshpande taunts Shivsena MP Sanjay Raut)
मे महिन्यात महाराष्ट्र कोरोनाच्या गंभीर संकटाचा सामना करत असताना प्रशासकीय निर्णयांच्या अंमलबजावणीवरून महाविकासआघाडी सरकार आणि राज्यपालांमध्ये वाद निर्माण झाला होता. त्यावेळी संजय राऊत यांनी राजभवन म्हणजे फालतू राजकारणाचा अड्डा झाल्याची टीका केली होती. या टीकेमुळे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी प्रचंड दुखावले गेले होते. या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी राज्यपालांची भेट घेऊन वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा संजय राऊत यांनी राज्यपालांना कोपरापासून दंडवत केला होता. भगतसिंह कोश्यारी हे माझ्यापेक्षा वयाने मोठे आहेत, म्हणून मी असा नमस्कार केला, असे राऊत यांनी सांगितले होते. मात्र, आता मनसेकडून याच फोटोचा वापर करून संजय राऊत यांच्यावर निशाणा साधण्यात आला आहे.
महाराष्ट्राचा अपमान करतांना खुद्द संजय राऊत pic.twitter.com/7K7HqD8tEl
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) October 31, 2020
राज्यपालांना थेट भेटणं हा महाराष्ट्राचा अपमान; राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
राज्यपालांना कार्यकारी अधिकार नाहीत हे सर्वांनाच माहीत आहे. तरीही काही लोक राज्यपालांना भेटत असतात. मुख्यमंत्र्यांऐवजी राज्यपालांना थेट भेटणं हा महाराष्ट्राचा अपमान आहे, अशी टीका शिवसेना नेते संजय राऊत यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर केली होती.
पुण्यात पत्रकारांशी संवाद साधताना संजय राऊत यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य करताना भाजपसह राज ठाकरे यांनाही फैलावर घेतलं. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहेत. ते लोकनियुक्त मुख्यमंत्री आहेत. त्यांना राज्याचे निर्णय घेण्याचे कार्यकारी अधिकार आहेत. पण असं असताना काही लोक मुख्यमंत्र्यांना भेटत नाहीत. त्याऐवजी लोकांचे प्रश्न घेऊन थेट राज्यपालांना भेटतात. राज्यपालांना कार्यकारी अधिकार नसतानाही भेटतात. हा महाराष्ट्राचा अपमान असल्याचे राऊत यांनी पत्रकारपरिषदेत म्हटले होते.
संबंधित बातम्या:
बाळासाहेबांच्या काळात राजकारणाचा केंद्रबिंदू मुंबईत होता, आता पुण्यात; राऊतांचं सूचक विधान
राज्यपाल कोश्यारी सुद्धा शरद पवारांना नेता मानतात याचा आनंद; राऊतांचा खोचक टोला
( MNS leader Sandeep Deshpande taunts Shivsena MP Sanjay Raut)