MNS : लक्षात ठेवा वारसा वास्तूचा नसतो तर विचारांचा असतो; दसरा मेळाव्याच्या वादावर मनसेची पहिल्यांदाच प्रतिक्रिया
शिवाजी पार्कमध्ये दरवर्षी शिवसेनेचा दसरा मेळावा होतो. मात्र यंदा दसरा मेळावा कोणाचा असणार एकनाथ शिंदे की उद्धव ठाकरे असा नवा वाद आता निर्माण झाला आहे. यावर मनसेच्या वतीने प्रतिक्रिया देण्यात आली आहे.
मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे राज्याच्या राजकारणात मोठा राजकीय पेच निर्माण झाला आहे. महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आल्याने उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले. त्यामुळे शिवसेना (Shiv Sena) आणि शिंदे गटातील संघर्ष अधिकच तीव्र झाला. हे प्रकरण एवढ्यावरच थांबले नाही तर आम्हीच खरी शिवसेना आहोत असा दावा शिंदे गटाकडून करण्यात आला आहे. शिंदे गटाकडून शिवसेनेचे चिन्ह असलेल्या धनुष्यबाणावर देखील दावा करण्यात आला आहे. शिवाजी पार्कमध्ये दरवर्षी शिवसेनेचा दसरा मेळावा होतो. मात्र यंदा दसरा मेळावा कोणाचा असणार एकनाथ शिंदे की उद्धव ठाकरे असा नवा वाद आता निर्माण झाला आहे. दसरा मेळाव्यावरून दोन्ही गट आमने-सामने आले असताना या प्रकरणावर प्रथमच मनसेच्या वतीने प्रतिक्रिया देण्यात आली आहे.
संदीप देशपांडेंच ट्विट
मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ट्विट करत यावर प्रतिक्रिया दिली आहे. ‘शिवतीर्थ’वर होणारा दसरा मेळावा म्हणजे बाळासाहेबांच्या विचारांचे सोने लुटणे ! आजच्या घडीला दोनही गटांचे त्यावरून घमासान चालू आहे पण त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे “वारसा हा वास्तूचा नसतो, तर विचारांचा असतो” असं ट्विट संदीप देशपांडे यांनी केलं आहे. तर दुसरीकडे काहीही झालं तरी शिवाजी पार्कमध्ये शिवसेनेचाच दसरा मेळावा होणार असं शिवसेना नेते आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता शिवाजी पार्कमध्ये नेमका कोणाचा दसरा मेळावा होणार याबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
‘शिवतीर्थ’वर होणारा दसरा मेळावा म्हणजे बाळासाहेबांच्या विचारांचे सोने लुटणे ! आजच्या घडीला दोनही गटांचे त्यावरून घमासान चालू आहे पण त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे “वारसा हा वास्तूचा नसतो, तर विचारांचा असतो” pic.twitter.com/bkTLZaEXMm
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) August 30, 2022
आरोप- प्रत्यारोपाचं राजकारण
यंदा शिवाजी पार्कवर कोणाचा दसरा मेळावा होणार, उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे यावर राज्यात जोरदार चर्चा सुरू आहे. तर दुसरीकडे दसरा मेळाव्यावरून शिंदे गट आणि शिवसेनेत देखील जोरदार आरोप -प्रत्यारोप सुरू असल्याचे पहायला मिळत आहे. काहीही झालं तरी शिवाजी पार्कमध्ये शिवसेनेचाच दसरा मेळावा होईल असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे. तर जे नियमात असेल ते होईल हे सरकार नियमाच्या बाहेर जाऊन कोणतेही काम करत नसल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.