संभाजीनगरात MIM विषयी हू का चू नाही, पण मतांसाठी शिवसेनेनं मान झुकवली, मनसे प्रवक्ते योगेश खैरैंचा आरोप काय?
Rajyasabha Election 2022: राज्यसभा निवडणुकीत मतं मिळवण्यासाठी शिवसेनेनं हिंदुत्वविरोधी पक्षांसमोर मान झुकवल्याचा मनसेचा आरोप
मुंबईः औरंगाबादमधील सभेत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी एमआयएमविषयी चकार शब्दही काढला नाही. उलट त्यांचीच स्क्रिप्ट वाचण्यात आली आणि आता राज्यसभा निवडणुकीसाठी एमआयएम (MIM) आणि समाजवादी पार्टीचा पाठिंबा घेतला जातोय. शिवसेनेच्या या धोरणांचा काळा इतिहास लिहिला जाणार, अशी टीका मनसे नेते योगेश खैरे (Yogesh Khaire) यांनी केली आहे. उद्धव ठाकरे यांची 08 जून रोजी औरंगाबादमध्ये भव्य सभा झाली. या सभेत मुख्यमंत्री एमआयएमवर काय टीका-टिप्पणी करतात, याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. मात्र सभेत मुख्यमंत्र्यांनी या विषय़ाचा काहीच उल्लेख केला नाही. ही सर्व राज्यसभा निवडणुकांसाठीची खेळी होती, असा आरोप मनसेनं केला आहे. हिंदुत्वविरोधी पक्षांसमोर केवळ दोन चार मतांसाठी मान झुकवल्याची नोंद इतिहासात घेतली जाणार, अशा आशयाचं ट्वीट योगेश खैरे यांनी केलं आहे.
योगेश खैरेंचं ट्वीट काय?
औरंगाबादमधील सभेचा उल्लेख करताना योगेश खैरेंनी म्हटलं, ‘ संभाजीनगर सभेत एमआयएम बद्दल हू का चू नाही…. उलट त्यांचीच स्क्रिप्ट वाचण्यात आली ! आणि आता एमआयएम – सपाचा पाठिंबा घेतला जात आहे…. शिवसेनेचे उमेदवार विजयी होतील का नाही हे कळेलच पण या ‘हिंदुत्वविरोधी’ पक्षांसमोर दोन – चार मतांसाठी मान झुकवली हा काळा इतिहास मात्र लिहिला जाणार !..’
संभाजीनगर सभेत एमआयएम बद्दल हू का चू नाही…. उलट त्यांचीच स्क्रिप्ट वाचण्यात आली !
आणि आता एमआयएम – सपाचा पाठिंबा घेतला जात आहे…. शिवसेनेचे उमेदवार विजयी होतील का नाही हे कळेलच पण या ‘हिंदुत्वविरोधी’ पक्षांसमोर दोन – चार मतांसाठी मान झुकवली हा काळा इतिहास मात्र लिहिला जाणार !
— Yogesh Khaire योगेश खैरे (@YogeshKhaire79) June 10, 2022
उद्धव ठाकरेंच्या भाषणाचं MIM कडून स्वागत
दरम्यान, योगेश खैरे किंवा मनसेच्या आरोपात तथ्य असल्याची चर्चाही राजकीय गोटात रंगली आहे. कारण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं भाषण खरोखरच अत्यंत खबरदारीपूर्वक केल्याचं दिसून आलं. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी औरंगाबादच्या मुख्य पाण्याच्या प्रश्नाला हात घातला. तसेच संभाजीनगर, एमआयएम, औरंगजेबाची कबर आदी विषय एक तर टाळलेच किंवा त्यावर अत्यंत सावधगिरी बाळगली. त्यामुळे एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या भाषणातील मुद्द्यांचं स्वागत केलं.
एमआयएम मविआला मत देणार
राज्यसभा निवडणुकीत एमआयएम कुणाला मत देणार, याकडे सर्वांचं लागलं होतं. मतदानाच्या आदल्या दिवशीपर्यंत एमआयएमनं याबद्दल सस्पेन्स कायम राखलं होतं. नेते असदुद्दीन ओवैसी यांनीदेखील शिवसेनेला उघड आव्हान दिलं होतं. तुम्हाला मतं हवी असतील तर आम्हाला जाहीररितीने मागावीत, असं ते म्हणाले होते. मात्र अखेर मतदानाच्या दिवशी पहाटेच्या सुमारास एमआयएमने आपली भूमिका उघड केली आणि मविआला मतदान करणार असल्याचं जाहीर केलं.