मनसे आमदार राजू पाटील यांचं महायुतीवर मोठं वक्तव्य
सध्या जोरदार चर्चा सुरू आहे, ती म्हणजे महापालिका निवडणुकांसाठी भाजप, शिंदे गट आणि मनसे यांची युती होणार का? यावर मनसे आमदार राजू पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मुंबई : मुंबईसह राज्याच्या अनेक प्रमुख शहरातील महापालिकेच्या निवडणुका लवकरच होणार आहेत. राज्याच्या प्रमुख पक्षातील नेते निवडणुकीच्या तयारीला देखील लागल्याचं चित्र आहे. मात्र सध्या जोरदार चर्चा सुरू आहे, ती म्हणजे महापालिका निवडणुकांसाठी भाजप (BJP), शिंदे गट आणि मनसे (MNS) यांची युती होणार का? गेल्या काही दिवसांपासून मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी जवळीक वाढली आहे. हे तिनही नेते एकत्र आल्याचं पहायला मिळालं. यावरून आता महापालिका निवडणुकीसाठी भाजप, मनसे आणि शिंदे गट यांची युती होणार असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे. यावर मनसे आमदार राजू पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जर तशी वेळ आली आणि राजसाहेबांचे आदेश आले तर आम्ही युतीसाठी तयार असू असं राजू पाटील यांनी म्हटलं आहे.
राजू पाटील यांनी नेमकं काय म्हटल?
काही गोष्टी या राजकारण सोडून बघायला पाहिजे, सरकार जर आमच्या मागण्याचा सकारात्माक विचार करणार असेल तर जवळ येण्यास काहीच हरकत नाही. पूर्वीच्या सरकारमध्ये आमच्या मागण्याचा सकारात्मक विचार झालाच नाही. उलट त्या कशा पूर्ण होणार नाहीत याकडे लक्ष देण्यात आले असं राजू पाटील यांनी म्हटलं आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले की, मागण्याचा सकारात्मक विचार होत असल्यानं आमची जवळीक वाढली आहे. मात्र या भेटीगाठीचा कोणीही असा अर्थ काढू नये. कारण माननीय राजसाहेबांनी काही दिवसांपूर्वीच सांगितलं की आम्ही स्वबळावर लढणार आहोत. परंतु अशी काही परिस्थिती निर्माण झाली तर युती करायलाही काही हरकत नाही. कारण सध्या ज्या युत्या, आघाड्या होतात त्यामध्ये कोणाकडेच काही बोलायला राहिलं नाही. मग आम्ही आमचा पक्ष वाढवायचा नाही का? राजसाहेबांचे आदेश आले तर आम्ही त्याला तयार असू, आणि इतरांची पण काही हरकत नसावी, असं राजू पाटील यांनी म्हटलं आहे.