मनसेच्या एकमेव आमदाराचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’, शिवसेनेत प्रवेश
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे एकमेव आमदार शरद सोनवणे यांची अखेर ‘घरवापसी’ झाली. मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांनी शिवबंधन बांधलं. त्यांच्यासह जुन्नरमधील हजारो कार्यकर्त्यांनी शिवबंधन बांधलं. मातोश्रीवर दहा हजारांपेक्षा जास्त शिवसैनिक आल्याचं शिरुरचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी सांगितलं. अनेकांना मातोश्रीमध्ये प्रवेश करता आला नाही. राज ठाकरेंविषयी कोणतीही नाराजी नसल्याचं सांगत शरद […]
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे एकमेव आमदार शरद सोनवणे यांची अखेर ‘घरवापसी’ झाली. मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांनी शिवबंधन बांधलं. त्यांच्यासह जुन्नरमधील हजारो कार्यकर्त्यांनी शिवबंधन बांधलं. मातोश्रीवर दहा हजारांपेक्षा जास्त शिवसैनिक आल्याचं शिरुरचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी सांगितलं. अनेकांना मातोश्रीमध्ये प्रवेश करता आला नाही.
राज ठाकरेंविषयी कोणतीही नाराजी नसल्याचं सांगत शरद सोनवणे यांनी शिवसेना प्रवेशावर पहिली प्रतिक्रिया दिली. पक्षाविषयी नाराजी नसली तरी स्वगृही परतण्याची ओढ लागली होती म्हणून मनसे सोडण्याचा निर्णय घेतला, असं शरद सोनवणे यांनी सांगितलं. शिवाय मनसे सोडणारे खरंच खुश होते का, असा प्रश्नही उद्धव ठाकरेंनी विचारला.
शरद सोनवणे हे पुणे जिल्ह्यातील जुन्नर विधानसभा मतदारसंघातून मनसेचे आमदार आहेत. मनसेचे ते एकमेव आमदार होते. त्यामुळे मनसे आणि पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांना मोठा धक्का मानला जात. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने नुकताच म्हणजे 9 मार्च रोजीच पक्षाचा 13 वा वर्धापन दिन साजरा केला. याच्या दुसऱ्याच दिवशी मनसेचे एकमेव आमदार असलेले शरद सोनवणे यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला.
गेल्या विधानसभा निवडणुकीवेळी शिवसेनेत उमेदवारी नाकारल्याने शरद सोनवणे यांनी मनसेत प्रवेश केला होता आणि ते जिंकूनही आले. 2014 साली मनसेचे एकमेव आमदार ठरण्याचा मानही त्यांना मिळाला होता. काही दिवसांपूर्वीच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची व्यक्तिशः भेट घेऊन शरद सोनवणे यांनी दिलगिरी व्यक्त केली आणि दिलेल्या संधीबद्दल कृतज्ञता केली होती.
जुन्नर स्थानिक राजकारणात शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस असा कडवा संघर्ष आहे. त्यामुळे राजकीय भवितव्याच्या दृष्टीने समर्थकांच्या मागणीनुसार निर्णय घेतल्याचे आमदार शरद सोनवणे यांनी सांगितले. मनसेच्या वर्धापन दिनालाही शरद सोनावणे गैरहजर होते.