उस्मानाबादः जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील रामतीर्थ तांडा येथील प्रणिता मोहन पवार (Pranita Pawar) ही उत्कृष्ट कराटे पटू आहे. 2017 मध्ये तिने श्रीलंका येथे झालेल्या ऑलिपिंक स्पर्धेत (Olympic Competition) कराटेमध्ये पाकिस्तानच्या खेळाडूला पराभूत करून सुवर्णपदक मिळवलं होतं. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्पर्धेत देशाची मान उंचावली होती. मात्री दीड वर्षापूर्वी पवार कुटुंबियांवर संकट कोसळलं. प्रणिताचे वडील कोरोना संसर्गाने आजारी पडले आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. आज पवार कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आली आहे. मात्र प्रणिताला अर्थसहाय्य करण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पुढाकार घेतला आहे.
आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या कराटे पटूची अशी अवस्था पाहून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रणिता पवार आणि तिच्या कुटुंबीयांशी संवाद साधला. प्रणिताचे वडील रिक्षा चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. मात्र कोरोना काळात त्यांचं निधन झालं. आता प्रणिताची आई कसाबसा रोजगार मिळवून तीन मुलांचा सांभाळ करत आहेत. दिवसाची रोजी रोटी कशी बशी मिळते, पण मुलांचं शिक्षण कसं पूर्ण करायचा, हा मुख्य प्रश्न त्यांच्या समोर आहे. ही बाब लक्षात घेता उस्मानाबाद येथील जिल्हाप्रमुख प्रशांत नवगिरे यांनी पक्षप्रमुखांना सदर माहिती दिली. त्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रणिताला अर्थसहाय्य करण्याचा निर्णय घेतला. राज ठाकरे यांनी प्रणिताशी संवाद साधला. तसेच तिचे पालकत्व घेण्याचाही निर्णय जाहीर केला.
उस्मानाबादचे मनसे जिल्हाप्रमुख प्रशांत नवगिरे यांनी प्रणिता पवार हिच्या कुटुंबियांची भेट घेऊन तिचा राज ठाकरे यांच्याशी संवाद घडवून आणला. तसेच तिच्या आतापर्यंतच्या क्रीडा विषयक कामगिरीची माहिती घेतली. राज ठाकरे यांनी दिलेल्या आश्वासनानुसार, प्रणिताचे शैक्षणिक पालकत्व ते स्वीकारत असल्याचे कुटुंबियांना सांगितले. घरातला मुख्य आधार कोलमडून पडल्यामुळे निराधार झालेल्या पवार कुटुंबियांना राज ठाकरे यांच्या मदतीमुळे काहीसा आशेचा किरण दिसत आहे.
इतर बातम्या-