MNS Mumbai : भोंग्यानंतर आता मनसेचा गोमांसाविरोधात मोर्चा, काही ऑनलाईन फूड डिलीव्हरी कंपन्या टार्गेटवर
शिदींवरील भोंग्यांविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी भूमिका जाहीर केल्यानंतर आता गोमांस विक्रीवर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. स्विगी (Swiggy) आणि इतर काही ऑनलाइन फूड डिलिव्हरी (Online Food Delivery) कंपन्यांकडून मुंबईत थेट गोमांस विक्री केली जात असल्याचा आरोप पक्षाकडून करण्यात आला.
मुंबई – मशिदींवरील भोंग्यांविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी भूमिका जाहीर केल्यानंतर आता गोमांस विक्रीवर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. स्विगी (Swiggy) आणि इतर काही ऑनलाइन फूड डिलिव्हरी (Online Food Delivery) कंपन्यांकडून मुंबईत थेट गोमांस विक्री केली जात असल्याचा आरोप पक्षाकडून करण्यात आला. संबंधित कंपन्यांच्या संचालकांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. कारवाई न केल्यास येत्या काळात आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे. मुंबईत होणाऱ्या गोमांस विक्रीबाबत मनसेचे अंधेरी विधानसभेचे विभाग अध्यक्ष रोहन सावंत, उपाध्यक्ष चेतन पेडणेकर आणि विजय जैन यांनी गुरुवारी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांची भेट घेत निवेदन दिले.
नेमकं काय आहे प्रकरण
गुढी पाडव्याच्या दिवशी झालेल्या जाहीर सभेनंतर मनसे मुंबईसह अनेक महत्त्वाच्या शहरात आक्रमक झाली आहे. मशिदीवरील भोंगे हटवा नाहीतर त्याच्यासमोर हनुमान चाळिसा लावणार या वक्तव्याची महाराष्ट्रात चर्चा झाली. मनसेच्या घाटकोपर मधील कार्यकर्त्यांकडून तशी कृती देखील दुसऱ्या दिवशी पाहायला मिळाली. मनसेचे अंधेरी विधानसभेचे विभाग अध्यक्ष रोहन सावंत, उपाध्यक्ष चेतन पेडणेकर आणि विजय जैन यांनी गोमांस विक्रीबाबत मनसेचं गृहमंत्र्यांना निवेदन दिलं आहे. स्विगी आणि इतर काही ऑनलाइन फूड डिलिव्हरी कंपन्यांकडून मुंबईत थेट गोमांस विक्री केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. सरकारने बंदी घातलेली असता सुध्दा गोमांस विक्री कशी काय होते. हे कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहे असा प्रश्न चेतन पेडणेकर यांनी उपस्थित केला आहे.
भोंग्याच्या प्रकरणावरून पुण्यात मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी
मी उघड भूमिका घेतली म्हणून मला बाजूला केलं, यामुळं मी दुखावलो गेलो, रात्रभर झोप लागली नाही. पक्षातील ज्या लोकांना पक्ष वाढू नये असं वाटतं त्याच्यामुळे हे असं झालं आहे. मी या लोकांबद्दल राज ठाकरे यांना सांगितलं होतं, लेखी पत्र सुध्दा दिलं होतं, पण त्यावर काहीच झालं नाही. माझ्या प्रभागतल्या या सगळ्या मुस्लिम लोकांशी माझी नाळ जोडली गेली आहे. मी कसा त्यांच्या दारात जाऊन भोंगे लावणार असं पुण्यातील मनसेचे नेते वसंत मोरे यांनी सांगितलं.