विधानसभा निवडणुकीसाठी मनसेच्या दोन उमेदवारांची नावे जाहीर, अजय चौधरींविरुद्ध ‘हा’ हुकमी एक्का मैदानात
येत्या विधानसभा निवडणुकीत मनसे 225 ते 250 जागा लढवणार असल्याची घोषणा राज ठाकरेंनी केली होती. त्यानंतर आता मनसेच्या दोन उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.
MNS Vidhansabha Candidate Name : विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. याच पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे अॅक्शन मोडवर आले आहेत. येत्या विधानसभा निवडणुकीत मनसे 225 ते 250 जागा लढवणार असल्याची घोषणा राज ठाकरेंनी केली होती. त्यानंतर आता मनसेच्या दोन उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.
मनसेच्या विधानसभा निवडणुकीसाठी दोन उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून मुंबईतील शिवडी विधानसभा मतदारसघांतून मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांना उमेदवारी दिली जाणार आहे. तर पंढरपुरातील दिलीप धोत्रे यांना विधानसभेसाठीची उमेदवारी दिली जाणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्वत: याबद्दलची घोषणा केली आहे.
मुंबईत शिवसेना ठाकरे गट विरुद्ध मनसे लढत
गेल्या काही दिवसांपासून मनसेकडून महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील मतदारसंघांची चाचपणी केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर राज ठाकरे हे विविध जिल्ह्यांचे दौरे करत आहेत. त्यातच काही दिवसांपूर्वी मनसेने मुंबईतील 36 विधानसभा जागा लढवण्याची तयारी केल्याचे म्हटलं जात होतं. आता मनसेने मुंबईतील शिवडी विधानसभा मतदारसघांतून बाळा नांदगावकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. यामुळे शिवडी विधानसभा मतदारसंघात बाळा नांदगावकर विरुद्ध शिवसेना ठाकरे गटाचे अजय चौधरी अशी लढत होणार आहे.
पंढरपुरात भाजप विरुद्ध मनसे लढत
तसेच पंढरपूर विधानसभा मतदारसंघातून मनसे नेते दिलीप धोत्रे यांना उमेदवारी देण्यात येणार आहे. दिलीप धोत्रे हे भाजप आमदार समाधान आवताडे यांच्याविरुद्ध मैदानात उतरणार आहेत. त्यामुळे पंढरपुरात भाजप विरुद्ध मनसे अशी लढत होणार आहे.
“महायुती सरकारला पाठिंबा देण्याबद्दल मोठं विधान”
दरम्यान लोकसभा निवडणुकीपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुती सरकारला पाठिंबा दिला होता. लोकसभेच्या अनेक प्रचारसभेतही ते दिसले. त्यानंतर आता विधानसभा निवडणुकीत मात्र त्यांनी महायुती सरकारला पाठिंबा देण्याबद्दल मोठे विधान केले होते.
“मी त्यावेळी सांगितलं होतं की, ही युती लोकसभेला नरेंद्र मोदींना पाठिंबा देण्यासाठी आहे. मी त्यात विधानसभेबद्दल काहीही बोललो नाही. 1984 साली राजीव गांधींना बहुमत मिळालं होतं. त्यानंतर 30 वर्षांनी नरेंद्र मोदींना बहुमत मिळालं. आपण निवडणुकीच्या आधी काय बोलतो आणि निवडून आल्यानंतर काय करतोय याचं जर भान सुटलं तर हे असं होतं”, असे राज ठाकरेंनी नुक्त्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.