अमित ठाकरेंचं धडाक्यात लाँचिंग, 27 वर्षांतील पहिल्याच भाषणात म्हणाले ‘पायाखालची जमीन सरकली’
मनसेचे ज्येष्ठ नेते बाळा नांदगावकर यांनी ठराव मांडून अमित ठाकरेंचं धडाक्यात लाँचिंग केलं.
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांच्याकडे पक्षाने नवी जबाबदारी सोपवली आहे. मनसेच्या महाअधिवेशनात अमित ठाकरे यांची पक्षाच्या नेतेपदी नियुक्ती करण्यात आली. मनसेचे ज्येष्ठ नेते बाळा नांदगावकर यांनी ठराव मांडून अमित ठाकरेंचं धडाक्यात लाँचिंग (MNS Amit Thackeray Launch) केलं.
‘अमित ठाकरे यांना जबाबदारी मिळणार का, हे सातत्यानं विचारलं जात होतं. त्यामुळे अमित ठाकरे यांची मनसेच्या नेतेपदी निवड करावी, असा ठराव मी मांडत आहे. तो आपल्या मान्य असल्यास उभं राहून पाठिंबा द्यावा’ असं बाळा नांदगावकर म्हणाले. त्यानंतर मनसैनिकांनी जोरदार टाळ्या वाजवून पाठिंबा दिला. आई, वडील, पत्नी, सासू सासरे यांच्या साक्षीने अमित ठाकरे ठराव मांडतील, असं बाळा नांदगावकर म्हणताच टाळ्यांचा कडकडाट झाला.
‘मला ही संधी दिल्याबद्दल राजसाहेबांचे धन्यवाद. मी आज ठराव मांडणार आहे, हे काल संध्याकाळी सांगितलं, त्यामुळे पायाखालची जमीन सरकणं काय असतं, याची कल्पना आली. येत्या 2 महिन्यात पक्षाला 14 वर्ष पूर्ण होतील. 14 वर्षात मनसेचं पहिलंच अधिवेशन झालं. 27 वर्षात पहिल्यांदाच मी व्यासपीठावर बोलतोय. त्यामुळे हा आयुष्यातील खूप मोठा दिवस आहे’ असं म्हणत अमित ठाकरे यांनी ठराव मांडला.
‘परवडणाऱ्या आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी संपूर्ण शिक्षण पुनर्रचना होणे जरुरीचे आहे. लहान मुलांच्या पाठीवरचे दप्तराचे ओझे कमी करण्याची त्वरित अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. महाराष्ट्रात जागतिक गुणवत्तेचे खेळाडू निर्माण व्हावेत यासाठी क्रीडा विद्यापीठ होणे अतिशय आवश्यक आहेत. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रशिक्षण सुरु करायला हवे. हा ठराव मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मांडत आहे’ असा ठराव अमित ठाकरे यांनी मांडला.
मनसे नेत्यांचा ठराव… महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेतेपदी अमित ठाकरे ह्यांची नियुक्ती. समस्त महाराष्ट्र सैनिकांचं अनुमोदन. #मनसे_अधिवेशन pic.twitter.com/ej2p6bqZfO
— MNS Adhikrut (@mnsadhikrut) January 23, 2020
मनसेची शॅडो कॅबिनेट
इंग्लंड आणि अमेरिकेच्या धर्तीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना महाराष्ट्रात ‘शॅडो कॅबिनेट’ची संकल्पना राबवण्याची चिन्हं (Raj Thackeray MNS Shadow Cabinet) आहेत. राज्य सरकारमधील प्रत्येक मंत्र्यावर नजर ठेवण्यासाठी मनसेतून एक-एका नेत्याची नेमणूक केली जाण्याची शक्यता आहे.
संदीप देशपांडे, बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, अविनाश जाधव, अविनाश अभ्यंकर, शालिनी ठाकरे, जयप्रकाश बाविस्कर, संतोष धुरी, यशवंत किल्लेदार, अनिल शिदोरे यासारख्या बड्या नेत्यांचा शॅडो कॅबिनेटमध्ये समावेश असेल. मनसेच्या कोणत्या नेत्याकडे कोणत्या मंत्र्याची जबाबदारी असेल, हे पाहणं उत्सुकतेचं आहे.
मनसेचा नवा झेंडा
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षाच्या नव्या झेंड्याचं अनावरण केलं. मनसेचा नवा ध्वज भगव्या रंगाचा असून त्यावर मध्यभागी राजमुद्रा आहे. महाअधिवेशनाच्या सुरुवातीलाच मनसेच्या नव्या झेंड्याचं अनावरण करुन राज ठाकरेंनी पक्ष कात टाकत असल्याचे संकेत दिले आहेत.
मनसे आणि भाजप समविचारी, मनसेच्या झेंड्याच्या अनावरणानंतर गिरीश महाजनांकडून युतीचे संकेत
मनसेच्या महाअधिवेशनासाठी गोरेगावातील नेस्को ग्राऊण्डवर राज ठाकरे हे मातोश्री कुंदा ठाकरे, पत्नी शर्मिला ठाकरे, पुत्र अमित ठाकरे, सून मिताली ठाकरे आणि कन्या उर्वशी ठाकरे यांच्यासह सकाळी नऊ वाजताच दाखल झाले. त्यानंतर सव्वादहा वाजताच्या सुमारास मनसेच्या झेंड्याचं राज ठाकरेंनी अनावरण केलं. त्यानंतर पारंपरिक गोंधळ नृत्य सादर करत अधिवेशनाला सुरुवात झाली.
मनसेने तीन रंगाचा जुना झेंडा बदलून भगव्या रंगाचा ध्वज धारण केला आहे. यातून मनसे हिंदुत्ववादी विचारांची कास धरणार असल्याचे संकेत मिळत आहेत. सुलेखनकार अच्युत पालव यांनी मनसेच्या झेंड्याचं डिझाईन केल्याचं बोललं जात आहे. संभाजी ब्रिगेडसह काही संघटनांनी राजमुद्रा वापरण्यास केलेला विरोध झुगारुन मनसेने नवा झेंडा घेतला आहे.
MNS Amit Thackeray Launch