संमतीने ठेवलेले संबंध बलात्कार नसतो, मनसेच्या रुपाली पाटील यांचं रोखठोक वक्तव्य
धनंजय मुंडे यांच्या मदतीला मनसे नेत्या रुपाली पाटील धावून आल्या आहेत. याप्रकरणी त्यांनी धनंजय मुंडे यांची बाजू घेत तक्रारदार महिलेवर काही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.
मुंबई : राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे बलात्काराच्या आरोपामुळे चहूबाजूंनी अडचणीत सापडले आहेत. पक्ष पातळीवर देखील त्यांच्यावर झालेल्या आरोपांची गंभीर नोंद घेतली गेली आहे. अशातच धनंजय मुंडे यांच्या मदतीला मनसे नेत्या रुपाली पाटील धावून आल्या आहेत. याप्रकरणी त्यांनी धनंजय मुंडे यांची बाजू घेत तक्रारदार महिलेवर काही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. (MNS Rupali patil On Dhananjay munde Rape Case)
“बलात्कार झालेल्या महिलेला न्याय मिळालाच पाहिजे परंतु ज्यावेळी अत्याचार झाला त्याच वेळी गुन्हा दाखल करायचा होता.. तुमच्या म्हणण्याप्रमाणे जर 2006 पासून 2020 पर्यंत अन्याय होतोय तर मग तुम्ही आतापर्यंत का शांत बसलात?”, असा रोखठोक सवाल मनसे नेत्या रुपाली पाटील यांनी तक्रारदार महिला रेणू शर्मा यांना विचारला आहे.
रुपाली पाटील यांनी धनंजय मुंडे यांच्यावीरल बलात्काराच्या आरोपाच्या पार्श्वभूमीवर सविस्तर फेसबुक पोस्ट लिहिली आहे. या फेसबुक पोस्टमध्ये त्यांनी पीडितेला न्याय मिळायलाच हवा, अशी भूमिका घेताना ज्यावेळी अत्याचार झाला त्याच वेळी गुन्हा दाखल करायचा होता. आतापर्यंत का शांत बसलात, असा रोखठोक सवाल करत एकप्रकारे धनंजय मुंडे यांची बाजू घेतली आहे.
“बलात्कार झालेल्या महिलेला न्याय मिळालाच पाहिजे. बलात्कार हे तुमच्या राजकारणाची खेळी बनवू नका. आणि बायांनो तुमच्या संमतीचे शाररिक संबंध हे राजकारणात कोणाला वापरू देऊ नका… तुमच्यामुळे खरोखर पीडितेला, बलात्कार झालेल्या अन्याय झालेल्या भगिनींना न्याय मिळत नाही, अशी खंत व्यक्त करत एक महिला म्हणून लाज बाळगा”, असंही रुपाली पाटील यांनी म्हटलंय.
“बलात्कार हा त्या महिलच्या इच्छेविरुद्ध तथा बळजबरीने होत असतो, संमतीने ठेवलेले संबंध हा बलात्कार नसतो”, असंही सांगायला रुपाली पाटील विसरल्या नाहीत. शेवटी ‘जय महाराष्ट्र’ म्हणत त्यांनी त्यांची फेसबुक पोस्ट पूर्ण केली आहे.
बलात्कार झालेल्या महिलेला न्याय मिळालाच पाहिजे
राजकारणांनो बलात्कार हे तुमच्या राजकारण खेळी बनवून नका आणि बायांनो…
Posted by Rupali Patil Thombare on Tuesday, 12 January 2021
प्यार किया तो डरना क्या?, राज्यमंत्री सत्तारांकडून धनंजय मुंडे यांची पाठराखण
एकीकडे धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी विरोधी पक्ष भाजप करत आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादीच्या गोटातून सावध प्रतिक्रिया येत आहेत. असं असताना एका कार्यक्रमादरम्यान सत्तार यांना याविषयी प्रश्न विचारण्यात आला असता ‘प्यार किया तो डरना क्या?’, अशा बिनधास्त शब्दात त्यांनी धनंजय मुंडे यांची पाठराखण केली आहे.
“धनंजय मुंडे यांनी त्यांचे संबंध लपवून ठेवलेले नाहीत. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी सर्व खुलासा केला आहे. त्यांनी त्यांची बाजू महाराष्ट्रासमोर मांडली आहे. तसंच दोघांच्या संमतीने असलेल्या प्रेमाची कबुली दिली आहे. तर मग प्यार किया तो डरना क्या?”, असं म्हणत त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांनी गोपीनाथ मुंडे यांना वापरलेल्या वाक्याची आठवण करुन दिली.
संबंधित बातम्या
‘प्यार किया तो डरना क्या?’, मंत्री अब्दुल सत्तार धनंजय मुंडेंच्या मदतीला!