नियतीचं एक वर्तुळ पूर्ण, कारस्थान रचून राज ठाकरेंना बाहेर काढलं, उद्धव ठाकरेंविरोधात मनसेचा हल्लाबोल
ज्या पद्धतीने राज ठाकरे यांच्याविरोधात कट कारस्थान करून त्यांना पक्षाबाहेर जाण्यास भाग पाडलं, त्याच पद्धतीने उद्धव ठाकरे यांच्याकडून आज पक्ष हिरावून घेण्यात आला, असं बोललं जातंय. हाच मुद्दा मनसेनं उपस्थित केलाय.

मुंबईः ज्या पद्धतीने आमदार-खासदारांना फोडून एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेत (Shivsena)बंड केलं. शिवसेना पक्ष, नाव आणि चिन्हही मिळवलं. महाराष्ट्राच्या राजकीय (Maharashtra Politics) इतिहासातील ही ऐतिहासिक घटना अनेक अर्थांनी अभ्यासली जात आहे. शिवसेनेच्या वाटचालीत नियतीनं एक वर्तुळ पूर्ण केलं… हे वाक्य वारंवार राजकीय वर्तुळात ऐकवलं जातंय. ज्या पद्धतीने राज ठाकरे यांच्याविरोधात कट कारस्थान करून त्यांना पक्षाबाहेर जाण्यास भाग पाडलं, त्याच पद्धतीने उद्धव ठाकरे यांच्याकडून आज पक्ष हिरावून घेण्यात आला, असं बोललं जातंय. मनसे नेते संदीप देशपांडे यांनीही उद्धव ठाकरे आणि शिवसेना पक्षातील राजकारणावर टीका करताना हेच म्हटलं…
काय म्हणाले संदीप देशपांडे?
निवडणूक आयोगाच्या निर्णयावर बोलताना संदीप देशपांडे म्हणाले, ‘ ज्या पद्धतीने राज साहेबांना पक्षाबाहेर जाण्याचं कारस्थान रचलं त्यांनाच पक्षातून बाहेर पडण्याची वेळ आली आहे. नियती तिचं वर्तुळ पूर्ण करत असते. राज ठाकरे यांना शिवसेना पक्षबाहेर घालवण्याचे कुबाड ज्यांनी रचलं त्यांच्यावर आता तिचं वेळ आली आहे. नियतीने बदला घेतला आणि सूड घेतला. आदित्य ठाकरे म्हणायचे संपलेल्या पक्षावर बोलत नाही. आता गर्वाचं घर खाली झालं आहे…
नामर्दासारखे व्हीप पाळणार?
ठाकरे गटासमोरची यापुढील आव्हानं खूप मोठी आहेत. शिवसेना पक्ष एकनाथ शिंदे यांना मिळाल. त्यामुळे नव्या शिवसेना प्रतोदांचा व्हीप ठाकरे गटाचे आमदार-खासदार पाळणार का, हा मोठा प्रश्न आहे. संदीप देशपांडे यांनी नेमक्या याच गोष्टीवर बोट ठेवलंय. ते म्हणाले, आता तुम्ही नामर्दासारखे व्हीप पाळणार आहात की पदाला लाथ मारणार? संजय राऊत लाथ मारणार की लाचार होणार? शिंदे गटाचा व्हीप ठाकरे गट पाळणार का?
भावाला अडचणी आणलं..
राज ठाकरेंना मिळालेल्या वागणुकीवरून संदीप देशपांडे यांनी उद्धव ठाकरे यांना डिवचलं. ते म्हणाले, ‘तुम्हाला भावाला अडचणीत आणून कार्याध्यक्ष पद मिळालं. ते सांभाळता आलं नाही. मुख्यमंत्री पद सांभाळता आलं नाही. आता त्यांना उतरती कळा लागली आहे. उद्धव ठाकरे आयोगवर अक्षेप घेत आहेत. परंतु त्यांनी आयोगाने दिलेला निर्णय वाचावा.
मर्द असाल तर राजीनामा द्या..
संदीप देशपांडे म्हणाले, ‘ आमचं आव्हान आहे की राजीनामा द्या आणि निवडणुकीला सामोरे जा. खरे मर्द असाल तर राजीनामा द्या. तुमचं नाव गेलं आता तरीही तुमचा प्रॉपर्टीवर नजर आहे. काल राज साहेबांनी व्हिडिओ ट्विट केला होतं.. पैसा येतो पैसा जातो पण नाव गेलेलं परत मिळवता येत नाही.