भाषणं नव्हे नळावरची भांडणं, शिवसेनेच्या अंतर्गत वादांवर जहरी टीका
उद्धव ठाकरेंच्या भाषणात शिव्या घालण्याशिवाय काहीही नव्हतं. त्यामुळे विचारांचं सोनं लुटायला आलेल्या लोकांनी नळावरची भांडणं पाहिली, अशी टीका संदीप देशपांडे यांनी केली.
मुंबईः शिवाजी पार्कवरील (Shivaji Park) कालचं भाषण आणि एकूणच शिवसेना नेत्यांचे आरोप प्रत्यारोप ही भाषणं नव्हती तर नळावरचं भांडण होतं. शिवतीर्थावरील हे भांडण अवघ्या राज्यानं पाहिलं, अशी जहरी टीका मनसे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी केली आहे. शिवतीर्थावर (Shivteerth) विचारांचं सोनं लुटायला मिळेल, असं लोकांना वाटलं होतं. मात्र नळावरची भांडणं आणि उणीदुणी …. माझी बादली मागे, तुझी बादली पुढे का आली, या लेवलचा दसरा मेळावा होता, असं वक्तव्य संदीप देशपांडे यांनी केलं.
उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांनी दसरा मेळाव्याचा उपयोग एकमेकांना शिव्या घालण्यासाठी केला. यात नवे कोणतेही मुद्दे नव्हते, असं देशपांडे म्हणाले.
महापालिका निवडणुका जवळ आल्यात. त्या दृष्टीने काहीही घोषणा झाल्या नाहीत. गद्दार, खंजीर, खोके याव्यतिरिक्त मेळाव्यात काहीच नव्हतं…
गुढीपाडव्याचा राज ठाकरेंचा मेळावा होतो, त्यात नेहमी नवे विचार जनतेसमोर येतात. पण गेल्या 10 वर्षात शिवसेनेनं नवा कोणता विचार मांडलाय, असा सवाल संदीप देशपांडे यांनी केलाय.
गेली 7-8 वर्ष भाजप कसा वाईट आहे आणि त्यांना शिव्या घालण्यात गेली. आणि आता नवीन टार्गेट मिळालंय. ते 40 आमदार आणि त्यांचेच लोकं. त्यांना शिव्या घालण्यात जातात…
भोंगे असो रझा अकादमीचा असो.. मनसेने भूमिका घेतली. तसे तुम्ही स्वतः कोणती भूमिका घेतली? मग विचारतात, मी हिंदुत्व सोडलंय का? सांगा… कोण यांना सांगणारे? असा सवाल संदीप देशपांडेंनी केलाय.
रेल्वे भर्तीचं आंदोलन राज ठाकरेंनी केलं, त्यावेळी तुम्ही काय केलंत? शेपटा घालून घरी बसलात, अशी जहरी टीका संदीप देशपांडे यांनी केली.