फडणवीस, चंद्रकांत पाटील, पंकजा मुंडे आरोपीच्या पिंजऱ्यात, ‘मनसे’ची पोस्टरबाजी

| Updated on: Aug 26, 2019 | 8:26 AM

मनसेच्या कार्यकर्त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपच्या इतर नेत्यांवर भ्रष्टाचाराचा आरोप करत टार्गेट केलं आहे. दरम्यान मनसेच्या या पोस्टरबाजीमुळे येत्या विधानसभा निवडणुकीत भाजप सरकारच्या अडचणीत वाढ होणार आहे.

फडणवीस, चंद्रकांत पाटील, पंकजा मुंडे आरोपीच्या पिंजऱ्यात, मनसेची पोस्टरबाजी
Follow us on

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांना कोहिनूर मिल खरेदीप्रकरणी ईडीने(ED) नोटीस बजावत चौकशीसाठी बोलवलं होते. त्यानंतर ईडीने तब्बल 9 तास राज ठाकरेंची चौकशी केली. राज ठाकरे यांना ईडीच्या चौकशीचा सामना करावा लागल्याने मनसैनिकांनी (MNS) आक्रमक पावित्रा घेतला आहे. मनसेच्या कार्यकर्त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपच्या इतर नेत्यांवर भ्रष्टाचाराचा आरोप करत टार्गेट केलं आहे.

मनसेच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्राचे आरोपी या टॅगलाईनने सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट केले आहेत. यात भाजपच्या मंत्रिमंडळातील नेत्यांवर भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे. यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, परिवहन मंत्री दिवाकर रावते, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह अनेक मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप मनसेने केले आहेत.

मनसेने सोशल मीडियावर शेअर केलेल्या या पोस्टरमध्ये प्रत्येक खात्याचा मंत्री, त्याचा फोटो आणि त्यांच्यावर करण्यात आलेले भ्रष्टाचाराचे आरोप असे लिहीले आहे. त्या फोटोवर महाराष्ट्राचे आरोपी आणि मुख्यमंत्र्यांची क्लीन चिट असेही लिहीले आहे. तसेच या फोटोखाली राज्याचा केलाय नरक, नको हे सरकार परत अशीही टॅगलाईन दिली आहे.

दरम्यान मनसेच्या या पोस्टरबाजीमुळे येत्या विधानसभा निवडणुकीत भाजप सरकारच्या अडचणीत वाढ होणार आहे.