Modi cabinet expansion 2021 : नारायण राणे, प्रीतम मुंडेंना केंद्रात स्थान मिळण्याची शक्यता किती?
पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा आता जोर धरु लागलीय. महाराष्ट्रातून दोन मोठी आणि महत्वाची नावं समोर येत आहेत. त्यात खासदार नारायण राणे आणि खासदार प्रीतम मुंडे यांच्या नावाचा समावेश आहे.
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा आता जोर धरु लागलीय. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांची शुक्रवारी महत्वाची बैठक पार पडली. अशावेळी आता महाराष्ट्रातून दोन मोठी आणि महत्वाची नावं समोर येत आहेत. त्यात खासदार नारायण राणे आणि खासदार प्रीतम मुंडे यांच्या नावाचा समावेश आहे. तर महाराष्ट्रातील एका नेत्याचं केंद्रीय मंत्रिपद जाण्याचीही शक्यता व्यक्त केली जातेय. दरम्यान, राणे आणि मुंडे यांना मोदींच्या मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता किती आहे? या दोन्ही नेत्यांना केंद्रात कोणत्या कारणास्तव स्थान दिलं जाऊ शकतं, याबाबत राजकीय विश्लेषकांनीही भाष्य केलंय. (What are the chances of Narayan Rane and Pritam Munde joining the Union Cabinet?)
नारायण राणेंचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश होणार?
पंतप्रधान मोदींच्या मंत्रिमंडळात नारायण राणे यांना स्थान दिलं जाऊ शकतं असं सांगण्यात येत आहे. निरोप आल्यावर केंद्रात जाऊ, अशी प्रतिक्रियाही राणे यांनी दिली आहे. त्यामागे नारायण राणे हे राज्यातला मराठा समाजातील मोठा चेहरा आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन महाराष्ट्रात भाजपने रान पेटवलं असताना नारायण राणे यांना केंद्रात स्थान देत महाविकास आघाडी सरकार आणि खास करुन शिवसेनेला जेरीस आणण्याचा भाजपचा प्रयत्न असू शकतो, असा अंदाज राजकीय विश्लेषक संदीप प्रधान यांनी व्यक्त केलाय. त्याचबरोबर मुंबई महापालिकेच्या निवडणुका जवळ आल्या आहेत. राणे हे बराच काळ शिवसेनेत होते. तसंच त्यांना मुंबई महापालिकेतील खाच-खळगे माहिती आहेत. त्यांना राज्याच्या मुख्यमंत्रीपदाचाही अनुभव आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेला शह देण्यासाठी राणेंचा उपयोग होऊ शकतो, असा भाजपचा कयास असेल असंही त्यांनी म्हटलंय.
दुसरीकडे राज्याती एका नेत्यांचं मंत्रिपद जाईल आणि तो नेता म्हणजे रावसाहेब दानवे असू शकतील असा अंदाज ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे यांनी व्यक्त केलाय. दरम्यान, नारायण राणे यांना केंद्रात स्थान कितीपत दिली जाईल याबाबत आपल्या मनात शंका असल्याचंही त्यांनी म्हटलंय. नारायण राणे यांना मंत्रिपद दिल्यास भाजपच्या निष्ठावंतांमध्ये नाराजी पसरेल. तसंच राणे यांच्या उपयुक्तेपेक्षा उपद्रवमूल्य जास्त आहे. राणे यांच्यासह त्यांच्या दोन मुलांचाही भाजप विचार करेल. त्यामुळे राणे यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान दिलं जाईल, याबाबत साशंकता असल्याचं आवटे म्हणाले.
मोदींच्या मंत्रिमंडळात प्रीतम मुंडेंना स्थान मिळणार?
मोदींच्या मंत्रिमंडळात नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. अशावेळी महाराष्ट्रातून प्रीतम मुंडे हा मोठा चेहरा आहे. तसंच त्यांच्यामागे गोपीनात मुंडे यांचा मोठा वारसा आहे. राज्यातील ओबीसी चेहरा म्हणूनही प्रीतम मुंडे यांच्याकडे पाहिलं जात आहे. त्यामुळे कदाचित केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात प्रीतम मुंडे यांना स्थान दिलं जाऊ शकतं, असा अंदाज राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत.
संबंधित बातम्या :
नारायण राणे दिल्लीला रवाना, मोदींच्या मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची चिन्हं
What are the chances of Narayan Rane and Pritam Munde joining the Union Cabinet?