नवी दिल्ली : मी नारायण तातू राणे… अशा शब्दात महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे खासदार नारायण राणे यांनी आज केंद्रीय मंत्रिमंडळाची शपथ घेतली. त्यानंतर राणे पुत्रांनी आनंद व्यक्त केलाय. माजी खासदार निलेश राणे आणि आमदार नितेश राणे यांनी नारायण राणे यांच्या दिल्लीतील निवासस्थानी टीव्ही 9 मराठीच्या माध्यमातून शपथविधी सोहळा पाहिला. त्यानंतर माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत निलेश राणे आणि नितेश राणे यांनी आनंद व्यक्त केला. तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजप नेतृत्वाचे आभार मानले. दुसरीकडे राणे यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळाल्यामुळे कोकणात जल्लोष करण्यात येत आहे. (Narayan Rane sworn in as Union Minister, reaction of Nilesh Rane and Nitesh Rane)
नारायण राणे यांनी केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर निलेश राणे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली. त्यावेळी ते म्हणाले की, पंतप्रदान नरेंद्र मोदी, अमित शाह यांनी राणे साहेबांवर मोठी जबाबदारी टाकली आहे. ज्या ज्या वेळई त्यांच्यावर एखादी जबाबदारी टाकण्यात आली त्यावेळी त्यांनी ती पूर्ण करण्याचं काम केलंय. आज त्यांनी केंद्रीय मंत्री म्हणून शपथ घेतली आहे. याचा आम्हाला आनंद आहे. राणे साहेब हे राज्याच्या मुख्यमंत्रीपदीही अचानक पोहोचले होते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना पूर्वकल्पना दिली नव्हती. आजही अनेकजण राणे साहेबांचा मुख्यमंत्रीपदाचा कार्यकाळ आठवतात. साहेबांनी प्रत्येक पदाला खूप गांभीर्याने घेतलं आहे. आज त्यांना जी जबाबदारी दिली गेली ते ती चोखपणे बजावतील यात शंका नाही, असं निलेश राणे यांनी म्हटलंय.
दरम्यान, शिवसेनेच्या विरोधात राणे यांना प्रमुख अस्त्र म्हणून वापरलं जाईल, असा सवाल पत्रकारांनी विचारला असता केंद्रीय मंत्रिपद ही एक मोठी जबाबदारी आहे. तुम्ही त्याचा राजकीय अर्थ लावत असाल. पण साहेबांन देण्यात आलेली जबाबदारी मोठी आहे. नगरसेवक ते केंद्रीय मंत्री हा प्रवास मोठा आहे, सोपा नक्कीच नाही. हे येरागबाळ्याचं काम नाही. उरला प्रश्न शिवसेनेचा तर त्यांना आम्ही किंमत देत नाही. जे मिळालं त्यात आम्ही समाधानी असल्याचंही निलेश राणे म्हणाले.
नितेश राणे यांनीही राणे यांना मिळालेल्या केंद्रीय मंत्रिपदाबाबत आनंद व्यक्त केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह यांच्यासह राज्यातील आमचे नेते देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानतो. राणे कुटुंबासाठी हा मोठा आणि महत्वाचा दिवस आहे. महाराष्ट्राच्या काना कोपऱ्याचा राणे यांचा अभ्यास पक्षासाठी नक्कीच फायद्याचा ठरेल. भारतीय जनता पक्ष पुढील प्रत्येक निवडणुकीत एक नंबरचा पक्ष ठेवण्यासाठी राणे साहेब नक्कीच प्रयत्न करतील. ते महाराष्ट्रातील आजचे दोन तीन नंबरचे सर्वात अनुभवी नेते आहेत. काँग्रेसला 10 वर्षात कळालं नाही. पण भाजपने राणे साहेबांचं महत्वं 2 वर्षात जाणलं. भाजपने मला आमदार केलं. निलेश राणे यांना प्रदेश भाजपात स्थान दिलं, अशी प्रतिक्रिया आमदार नितेश राणे यांनी दिलीय.
संबंधित बातम्या :
Narayan Rane sworn in as Union Minister, reaction of Nilesh Rane and Nitesh Rane