‘मोदीच जिंकणार’ ही विरोधकांची अफवा, बळी पडू नका, मतदान करा : पंतप्रधान मोदी
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्याचं मतदानही पार पडलंय. आणखी तीन टप्पे बाकी आहेत. पण पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या एका वक्तव्यामुळे राजकीय चर्चा सुरु झाल्या आहेत. ‘मोदी जिंकले’ असं मतदानापूर्वीच सांगितलं जातंय, यावर लक्ष देऊ नका आणि मतदान करा, असं आवाहन मोदींनी केलंय. ‘मोदी जिंकले’ ही विरोधकांनी पसरवलेली अफवा असल्याचं मोदींनी म्हटलंय. मोदींनी मतदारांना जागरुक […]
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्याचं मतदानही पार पडलंय. आणखी तीन टप्पे बाकी आहेत. पण पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या एका वक्तव्यामुळे राजकीय चर्चा सुरु झाल्या आहेत. ‘मोदी जिंकले’ असं मतदानापूर्वीच सांगितलं जातंय, यावर लक्ष देऊ नका आणि मतदान करा, असं आवाहन मोदींनी केलंय. ‘मोदी जिंकले’ ही विरोधकांनी पसरवलेली अफवा असल्याचं मोदींनी म्हटलंय. मोदींनी मतदारांना जागरुक करण्यासाठी हे आवाहन केल्याचं बोललं जातंय. पण विश्लेषकांच्या मते, अति-आत्मविश्वासात समर्थकांनी मतदानापासून दूर राहू नये, यासाठी मोदींनी हे आवाहन केलंय.
एक वर्षापूर्वी उत्तर प्रदेशात झालेल्या गोरखपूर आणि फुलपूर या मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीत भाजपला पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. हे दोन्ही मतदारसंघ भाजपचे बालेकिल्ले मानले जातात. पण अति आत्मविश्वासामुळे हा पराभव झाल्याचा निष्कर्ष नंतर काढण्यात आला. अति आत्मविश्वास आणि उमेदवारांचा बेजबाबदारपणा या पराभवाला कारणीभूत होता, असं उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले होते. त्यामुळे या आत्मविश्वासाने घात होऊ नये यासाठी मोदींनीही सतर्कता बाळगली आहे.
पंतप्रधान मोदींनी झारखंडमधील सभेत काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. तीन टप्प्यातील मतदानानंतर विरोधकांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. चौथ्या टप्प्यातील मतदानानंतर परिस्थिती आणखी वाईट होईल, असं मोदी म्हणाले. “विरोधक म्हणतात की मोदी जिंकत आहेत त्यामुळे मतदान देण्याची गरज नाही. पण या लोकांच्या डावामध्ये अडकू नका आणि मोठ्या प्रमाणात मतदान करा”, असं आवाहन मोदींनी केलं. यापूर्वीही मोदींनी त्यांच्या प्रत्येक सभेत मोठ्या प्रमाणात मतदान करण्याचं आवाहन केलंय.
गेल्या वर्षी मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भाजपला पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. भाजपचा अत्यंत कमी फरकाने पराभव झाला असला तरी मतदानाचा टक्का घसरणं हे देखील एक कारण होतं. शिवाय लोकांनी मोठ्या प्रमाणात ‘नोटा’ला (None Of The Above) पसंती दिली होती. या पराभवातून धडा घेत भाजपने जास्तीत जास्त मतदारांना मतदान केंद्रापर्यंत आणण्याचा प्रयत्न केलाय.
VIDEO : मोदी काय म्हणाले?