नवी दिल्ली : राष्ट्रवाद, गरीबी, राष्ट्रीय सुरक्षा, शेतकरी प्रश्न अशा विविध विषयांवर गाजलेल्या निवडणुकीनंतर भाजप्रणित एनडीने महाकाय यश मिळवलंय. 350 जागांवर एनडीए दुसऱ्यांदा केंद्रात सत्ता स्थापन करणार आहे. तर सध्याच्या कलांनुसार काँग्रेस 50 च्या आतच थांबण्याची शक्यता आहे. एकट्या भाजपने स्वबळावर 300 चा आकडा पार केलाय. अब की बार, 300 पार हा नारा खरा करत भाजपने घवघवीत यश मिळवलंय.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात 2014 ला भाजपने पहिल्यांदाच पूर्ण बहुमत मिळवलं होतं. त्यावेळी मोदी लाट आली असं म्हटलं गेलं. पण यावेळी भाजपने दावा केल्याप्रमाणे त्सुनामी आल्याचं चित्र आहे. विशेष म्हणजे पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करुन पुन्हा एकदा एवढं मोठं बहुमत मिळवण्याची ही पहिलीच वेळ आहे.
मोदी लाटेत दिग्गज नेत्यांचा पराभव
अमेठीतून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, पाटणा साहिबमधून शत्रुघन सिन्हा, केंद्रीय मंत्री मनोज सिन्हा, काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे, ज्योतिरादित्य शिंदे, दिग्विजय सिंग, शीला दीक्षित, मिलिंद देवरा, जया प्रदा, पीडीपी प्रमुख मेहबुबा मुफ्ती, केंद्रीय मंत्री हंसराज अहिरत, बेगुसरायमधून कन्हैय्या कुमार यांचाही पराभव झालाय.
पश्चिम बंगालमध्ये भाजपने आतापर्यंतची सर्वोत्कृष्ट कामगिरी केली आहे. बंगालच्या 42 जागांपैकी भाजपच्या खात्यात तब्बल 18 जागा आल्या आहेत. याशिवाय दिल्ली, गुजरात, राजस्थान, हरियाणा, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, अरूणाचल प्रदेश, ओदिशा, त्रिपुरा, मणिपूर, मिझोराम, दमन दीव, दादरा नगर हवेली आणि चंदीगड या ठिकाणी भाजपने शतप्रतिशत विजय मिळवलाय. गुजरात आणि राजस्थानमधील सर्वच्या सर्व जागा 2014 प्रमाणेच भाजपने राखल्या आहेत. तर मध्य प्रदेशात 29 पैकी 28 जागा जिंकल्या आहेत.