मुंबई : भाजप नेते मोहित कंबोज (Mohit Kamboj) हे रेकी करण्याच्या हेतूनेच मातोश्रीबाहेर (Matoshree) आले होते, असा पुनरुच्चार शिवसेना नेते विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी केलाय. मोहित कंबोज यांच्या गाडीत हॉकी स्टीक्स आणि मोठ्या प्रमाणात हत्यारं होती, असा सनसनाटी आरोपही विनायक राऊतांनी केला आहे. विनायक राऊत यांनी शुक्रवारीही मोहित कंबोज यांच्यावर हल्लाबोल केला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा विनायक राऊतांनी गंभीर आरोप मोहित कंबोज यांच्यावर केलेत. मोहित कंबोज यांच्या गाडीवर शुक्रवारी हल्ला करण्यात आला होता. शुक्रवारी रात्री मातोश्रीसमोरच शिवसैनिकांनी मोहित कंबोज यांच्या गाडीवर हल्ला केला. त्यांच्या गाडीच्या दाराचा हॅन्डल आणि कारचा आरडा शिवसैनिकांनी फोडला होता. यावेळी मातोश्रीबाहेरच असलेल्या कलानगर सिग्नलवर एकच गोंधळ उडाला होता. त्यानंतर भाजपच्या नेत्यांनी या हल्ल्याचा निषेध केला होता. तर दुसरीकडे शिवसैनिकांनी आपल्या म्हणण्यावर ठाम राहत मोहित कंबोज रेकी करण्यासाठीच आले होते, असा आरोप केलाय.
दरम्यान, हा हल्ला अतिशय जीवघेणा होता असा आरोप मोहित कंबोज यांनी शिवसैनिकांवर केला होता. मात्र रेकी करण्यासाठी गेल्याचा आरोपही मोहित कंबोज यांनी फेटाळून लावला होता. एका पत्रकार मित्राच्या लग्नात मी गेलो होतो, असं मोहित कंबोज यांनी म्हटलंय.
दुसरीकडे शिवसैनिकांवर भाजपच्या नेत्यांनी टीका केली आहे. पोलिसांना हाताशी घेऊन दादागिरी केली जात असल्याचा आरोप भाजपनं शिवसेनेवर केलंय. नवनीत राणा आणि रवी राणा शुक्रवारी मुंबईत दाखल झाले. त्यापासूनच मातोश्रीबाहेर मोठ्या प्रमाणात जमा झाले. दरम्यान, नवनीत राणा यांना मदत करण्याच्या हेतून मोहित कंबोज आले होते, असाही आरोप शिवसैनिकांनी केला होता. त्यासाठी ते रेकी करत होते, असं म्हणत शिवसैनिकांनी कंबोज यांच्यावर निशाणा साधला होता.
दरम्यान, पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. रात्रीपासूनच पोलिसांनी खार येथील राणांच्या निवासस्थानी आणि मातोश्रीबाहेरही पोलिसांनी तगडा पोलीस बंदोबस्त ठेवला.