नवी दिल्ली : पावसाळी अधिवेशनात (Monsoon Assembly Session) महागाई, बेरोजगारी, जीएसटी आणि तपास यंत्रणांच्या कारवाईबाबत विरोधकांचा गदारोळ सुरूच आहे. या गदारोळामुळे राज्यसभेतील 11 खासदारांना (Rajyasabha MP) आठवडाभरासाठी सभागृहातून निलंबित करण्यात आले आहे. यापूर्वी सोमवारी काँग्रेसच्या (Congress) चार खासदारांना निलंबित करण्यात आले होते. राज्यसभेत गदारोळ केल्याप्रकरणी विरोधी खासदारांवर कारवाई करण्यात आली. उपसभापतींनी 11 खासदारांना निलंबित केले. या खासदारांमध्ये तृणमूलच्या खासदार सुष्मिता देव, डॉ. शांतनु सेन आणि डोला सेन, शांता छेत्री, मोहम्मद अब्दुल्ला, ए.ए. रहीम, कनिमोझी, एल. यादव आणि व्ही.व्ही. शिवदासन, अबीर रंजन बिस्वास, नदीमुल हक यांचा समावेश आहे. देशात सध्या विविध मुद्द्यांवरून राजकारण तापलं आहे. अशातच या खासदारांचं निलंबन झाल्याने विरोधक आता आणखी आक्रमक मोडवर येण्याची शक्यता आहे.
TMC MPs Sushmita Dev, Dr Santanu Sen and Dola Sen among other Rajya Sabha MPs suspended for remaining part of the week for “misconduct” by entering well of the House and sloganeering
House adjourned for next 20 minutes pic.twitter.com/dIJkjR6hHe
— ANI (@ANI) July 26, 2022
खासदारांवर ही कारवाई उपसभापती हरिवंश नारायण सिंह यांनी केली आहे. खासदारांनी सभागृहाच्या कामकाजात व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला, त्यानंतर उपसभापतींनी त्यांना आठवडाभरासाठी निलंबित करण्याचे आदेश दिले.
तत्पूर्वी सोमवारी लोकसभेत विरोधी खासदारांनी महागाई आणि जीएसटीच्या वाढत्या दरांविरोधात निदर्शने केली. लोकसभेत गोंधळ घातल्याप्रकरणी काँग्रेसच्या चार खासदारांवर कारवाई करण्यात आली. मणिकम टागोर, टीएम प्रतापन, ज्योतिमणी, रम्या हरिदास यांना संपूर्ण अधिवशनाच्या कालावधीसाठी निलंबित करण्यात आले.
दुसरीकडे ईडीने आज सोनिया गांधी यांची चौकशी केली. ईडीच्या कारवाईच्या विरोधात काँग्रेसने संसदेपासून रस्त्यापर्यंत गदारोळ केला. काँग्रेसच्या खासदारांनी सभागृहात हा मुद्दा उपस्थित केला तर काँग्रेसच्या कार्यालयातून बाहेर पडत काँग्रेस नेत्यांनी निदर्शने केली. यानंतर राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस खासदारांनी संसद भवन ते विजय चौकापर्यंत मोर्चा काढला. याठिकाणी राहुल गांधीही आंदोलनाला बसले. यानंतर पोलिसांनी राहुल गांधी आणि काँग्रेस खासदारांना ताब्यात घेतले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राहुल गांधी आणि काँग्रेसच्या 50 खासदारांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यामुळे सध्या देशभरातील राजकीय वातावरणही तापलं आहे. महाराष्ट्रातही काँग्रेस नेत्यांनी या ईडी चौकशीविरोधात जोरदार आंदोलनं केली आहेत.