काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे दिग्गज आठवडाभरात भाजपात असतील : गिरीश महाजन
मुंबई : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव सुजय विखे यांनी अखेर भाजपचा झेंडा हातात घेतला. भाजपने त्यांना अहमदनगरमधून लोकसभेचं तिकीट देण्याची घोषणाही केली आहे. सुजय विखेंच्या भाजप प्रवेशामध्ये सर्वात मोठा आहे तो म्हणजे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांचा. फडणवीस सरकारचे संकटमोचक गिरीश महाजन यांनी आणखी एक खुलासा केलाय. काँग्रेस आणि राष्ट्रवादीतले अनेक मोठे […]
मुंबई : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव सुजय विखे यांनी अखेर भाजपचा झेंडा हातात घेतला. भाजपने त्यांना अहमदनगरमधून लोकसभेचं तिकीट देण्याची घोषणाही केली आहे. सुजय विखेंच्या भाजप प्रवेशामध्ये सर्वात मोठा आहे तो म्हणजे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांचा. फडणवीस सरकारचे संकटमोचक गिरीश महाजन यांनी आणखी एक खुलासा केलाय. काँग्रेस आणि राष्ट्रवादीतले अनेक मोठे नेते येत्या काळात भाजपात येणार असल्याचं त्यांनी म्हटलंय.
भाजपात येण्यासाठी मोठमोठ्या नेत्यांची रांग लागली आहे. हे नावं आत्ताच सांगता येणार नाहीत, पण आठवडाभरात तुम्हाला कळेल, काँग्रेस आणि राष्ट्रवादीतले दिग्गज नावं यात आहेत, असं गिरीश महाजन म्हणाले. काँग्रेस आणि राष्ट्रवादीची धाकधूक गिरीश महाजन यांनी वाढवली आहे. कारण, सध्या अनेक जण भाजपच्या वाटेवर असल्याचं त्यांनी सांगितलंय आणि त्याची चुणूकही विविध ठिकाणी लागली आहे.
“राष्ट्रवादीने अख्खी टोळी फोडली होती”
भाजपने काँग्रेसमुक्त भारतचा नारा दिलाय खरा, पण काँग्रेसयुक्त भाजप होतोय का, असाही प्रश्न गिरीश महाजन यांना विचारण्यात आला. यावरही त्यांनी उत्तर दिलं. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाडांनी ट्वीट केलंय, की पोरं पळवणारी टोळी आली आहे, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पालकांनी मुलांना सांभाळावं. या ट्वीटला गिरीश महाजनांनी उत्तर दिलं. ते म्हणाले, राष्ट्रवादीवर ही वेळ आलीय याचं वाईट वाटतं. राष्ट्रवादीचा जन्मच काँग्रेसमधून झाला होता. अख्खी टोळीच घेऊन शरद पवार बाहेर पडले होते, पण नंतर काँग्रेसची सत्ता आली आणि परत सत्तेसाठी काँग्रेसच्या जवळ गेले. त्यामुळे आम्हाला पोरं पळवणारी टोळी म्हणत असले तरी यांनी अख्खी टोळीच फोडली होती, असा टोला गिरीश महाजनांनी लगावला.
अगोदर शिवसेनेत असलेले छगन भुजबळ, भाजपात असलेले धनंजय मुंडे यांच्या नावाची उदाहरणेही गिरीश महाजनांनी दिली. राष्ट्रवादीनेही अनेक नेते फोडलेले आहेत, असं ते म्हणाले.
ही दोन नावं निश्चित?
माढ्याचे विद्यमान राष्ट्रवादीचे खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांचे सुपुत्र रणजितसिंह मोहिते पाटील (Ranjit singh Mohite Patil) हे भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. थेट विद्यमान राष्ट्रवादीच्या खासदाराचा सुपुत्र भाजपमध्ये प्रवेश करत असल्यामुळे हा मोहिते पाटलांसह राष्ट्रवादीला मोठा धक्का आहे.
रणजितसिंह मोहिते पाटील हे गेल्या अनेक महिन्यांपासून असस्वस्थ आहेत. आपलं राजकीय खच्चीकरण होत असल्याचा आरोप त्यांनी सातत्याने बोलून दाखवला होता. गेल्या अनेक दिवसांपासून माढा लोकसभा मतदारसंघात खदखद सुरु आहे. त्या वादातूनच स्वत: विजयसिंह मोहिते पाटलांनी शरद पवारांना इथे निवडणूक लढण्यास सांगितलं होतं. त्यानंतर शरद पवारांनीही निवडणूक लढण्याची घोषणा केली होती. मात्र काल कौटुंबीक कारण देत पवारांनी माढ्यातून माघार घेतली.
काँग्रेस आमदाराचा भाजप प्रवेश निश्चित
नारायण राणेंचे कट्टर समर्थक आणि काँग्रेसचे आमदार कालिदास कोळंबकर हे भाजपच्या वाटेवर आहेत. येत्या काही दिवसात कालिदास कोळंबकर भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. मी इतकी वर्षे आमदार आहे, पण स्थानिक लोकांचे मोठे प्रश्न सुटले नव्हते, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ते सोडवले. सेनेच्या अनेक नेत्यांसोबत माझे चांगले संबंध आहेत. माझा प्रवेश काही अटी शर्थी ठरला की होईल, असं आमदार कालिदास कोळंबकर म्हणाले.
गिरीश महाजन काय म्हणाले पाहा?