50 हून अधिक काँग्रेस नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश, मुख्यमंत्री यांनी दिला मोठा इशारा
मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे दिग्गज नेते कमलनाथ हे लवकरच भाजपात प्रवेश करणार अशा चर्चा सुरु होत्या. सुमारे दोन डझन आमदारांसह ते भाजपमध्ये प्रवेश करणार अशा बातम्या समोर येत होत्या. मात्र, त्याआधीच भाजपने कॉंग्रेसला मोठा सुरुंग लावला.
छिंदवाडा | 21 फेब्रुवारी 2024 : मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि कॉंग्रेस नेते कमलनाथ भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली होती. कॉंग्रेस नेत्यांनी त्याचे खंडन करत ते कुठेही जाणार नसल्याचे सांगितले. मात्र, कमलनाथ यांच्या बालेकिल्ल्यातील 50 हून अधिक काँग्रेस नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री मोहन यांनी या नेत्यांचे पक्षात स्वागत केले आहे. तसेच, कॉंग्रेसला इशाराही दिलाय.
मुख्यमंत्री मोहन यादव यांच्या उपस्थितीमध्ये एक दोन नव्हे तर ५० हून अधिक काँग्रेस नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी बोलताना मुख्यमंत्री मोहन यादव यांनी ‘काँग्रेस आणि इतर पक्षांच्या लोकांची मने डळमळीत झाली आहेत. आज नाही तर उद्या ते आमच्या कुटुंबात सामील होतील. काही आज येतील आणि काही उद्या येतील. येणाऱ्या प्रत्येकाचे स्वागत आहे. कारण आपल्याला भारताची सेवा करायची आहे. मुख्यमंत्री मोहन यांच्या ‘काही आज येतील आणि काही उद्या येतील.’ या विधानाचा रोख कमलनाथ यांच्याकडे असल्याचे बोलले जात आहे.
मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी बालाघाट आणि छिंदवाडा येथे भेट दिली. छिंदवाडा येथे पोहोचण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी बालाघाटमध्ये 761.54 कोटी रुपयांच्या विकासकामांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना ते म्हणाले, यावेळी होळी आणि महाशिवरात्रीमुळे 1 मार्च रोजी लाडक्या भगिनींच्या बँक खात्यात रक्कम जमा करण्यात येणार आहे.
छिंदवाडा येथे मुख्यमंत्री मोहन यांचे जंगी स्वागत करण्यात आले. त्यांनी चंदन गावातून पोलो मैदानापर्यंत रोड शो केला. चंदन गावात भाजप कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर जेसीबीमधून फुलांचा वर्षाव केला. त्यानंतर झालेल्या सभेत छिंदवाडामधील काँग्रेस प्रदेश कमिटीचे सरचिटणीस अज्जू ठाकूर, पांढुर्णा नगरपालिकेचे अध्यक्ष संदीप घाटोडे, 16 सरपंच आणि अन्य 32 नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. विशेष म्हणजे छिंदवाडा हा कमलनाथ यांचा बालेकिल्ला मानला जातो. तर ज्यांनी पक्ष प्रव्र्ष केला ते सर्व नेते कमलनाथ यांचे कट्टर समर्थक आहेत.