नवी दिल्ली : दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनावरुन तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणावर टीका करणारं जोरदार भाषण राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी लोकसभेत ठोकलं. अमोल कोल्हे यांनी पंतप्रधान मोदींच्या भाषणाचा समाचार घेताना (AMol Kolhe Speech in Loksabha) शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला. तसंच सरकारच्या भूमिकेवर कडाडून हल्ला चढवला. कोल्हेंच्या याच भाषणाची संपूर्ण देशभरात चर्चा होती. अशातच अमोल कोल्हे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. (MP Amol Kolhe Meet NCP Sharad Pawar)
पवारांच्या नवी दिल्लीतल्या निवासस्थानी डॉ. कोल्हे यांनी शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीवेळी देशाचे माजी गृहमंत्री तसंच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे उपस्थित होत्या. या भेटीत विविध मुद्द्यांवर चर्चा झाल्याची प्रतिक्रिया बैठकीनंतर अमोल कोल्हे यांनी दिली.
अमोल कोल्हे यांनी सोमवारी लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बोलताना मोदी सरकारला चांगलेच धारेवर धरले. त्यांनी शेतकरी आंदोनावरुनही सरकारला खडेबोल सुनावले. तसेच राष्ट्रपतींच्याच भाषणातील मुद्दे घेत त्यावर भाष्य करत मोदी सरकारची चांगलीच कोंडी केली. यावेळी त्यांनी शेतकरी प्रश्नावर सन्मानजनक तोडगा काढण्यासाठी सरकारने पुढे यावं, असं आपल्या भाषणातून ठासून सांगितलं.
“राष्ट्रपती महोदयांनी आपल्या अभिभाषणात केंद्र सरकारच्या विविध योजनांचा उल्लेख केला. या योजनांचा लाभ जर तळागाळातील लोकांना झाला असेल तर मी या सरकारचे अभिनंदन करतो. राष्ट्रपती महोदयांनी आपल्या अभिभाषणात नव्या संसद भवनाचे निर्माण करण्याबाबत उल्लेख केला. परंतु ज्या देशाची सार्वजनिक आरोग्यव्यवस्था कमकुवत असल्याचे कोरोनासारख्या महामारीने पुर्णतः उघड झाले असेल त्या देशाचे प्राधान्य काय असायला हवे? सध्या गरज लोकसभा मतदारसंघ, जिल्ह्यात सुसज्ज असे सार्वजनिक रुग्णालय उभारण्याची गरज आहे.”
“या सरकारला विनंती आहे की, देशाच्या आरोग्यव्यवस्थेची स्थिती पाहता अगोदर रुग्णालये आणि मग संसद भवन यावर आत्मचिंतन करावे. असंही या संसद भवनाची मागणी कुणीही केलेली नाही, परंतु ज्या निधीची मागणी सर्वजण करीत आहेत तो खासदार निधी तातडीने पुर्ववत केला जावा,” अशी मागणी अमोल कोल्हे यांनी सरकारकडे केली.
गेल्या 3 महिन्यांपासून दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करताना शहीद झालेल्या 200 भारतीयांचा, हो मी त्यांना जाणीवपूर्वक भारतीयच म्हणतोय, त्यांचा उल्लेख देखील नसावा? त्यांच्याप्रती किंचितही संवेदना या अभिभाषणात नमूद नसावी ही आश्चर्यजनक बाब आहे. प्रजासत्ताक दिनी जी घटना घडली त्याचा निषेध करण्यात आला. हिंसेचे कसलेही समर्थन होऊ शकत नाही, ना केले जाऊ शकते. परंतु या माध्यमातून शेतकरी आंदोलनाला बदनाम करण्याचा जो कट रचण्यात आला तो अतिशय निषेधार्ह आहे.”
“अगोदर सांगण्यात आलं की हे पंजाबचे शेतकरी आहेत, नंतर सांगण्यात आलं की ते आडते आहेत, नंतर सांगण्यात आलं की ते खलिस्तानी आहेत. त्यानंतर तथाकथित आयटी सेल आणि मीडियातील काहींनी त्यांना देशद्रोही घोषित करुन टाकले,” असंही त्यांनी नमूद केलं.
“जो बाप आपल्या 18 वर्षांच्या मुलाला सांगतो की उठ, तुला लष्करात भरती व्हायचंय, जी आई आपल्या मुलाला सांगते की जर देशावर शत्रुची गोळी आली तर तुला तुझी छाती पुढे करायची आहे, तर हा असा बाप, आई देशद्रोही कसे असू शकतात? मुलगा आज उणे अंश सेल्सिअस तापमानात सियाचीनमध्ये कर्तव्यावर आहे. त्याचवेळी त्याचा 70 वर्षांचा म्हातारा बाप कडाक्याच्या थंडीत दिल्लीच्या सीमांवर आपल्या न्याय्य हक्कांसाठी आंदोलन करतोय. या अशा परिस्थितीत ‘जय जवान,जय किसान’ कसं म्हणायचं?”, असं कोल्हे म्हणाले.
(MP Amol Kolhe Meet NCP Sharad Pawar)
हे ही वाचा :