नवी दिल्ली : मध्य प्रदेशातील काँग्रेस सरकारवर संकट ओढवलं आहे. 20 मंत्र्यांनी मुख्यमंत्री कमलनाथ (MP congress crisis) यांच्याकडे राजीनामा सोपवला आहे. त्यानंतर आता मध्य प्रदेशातील काँग्रेसचा महत्त्वाचा चेहरा असलेले ज्योतिरादित्य शिंदे (jyotiraditya Scindia meets PM Narendra Modi ) थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीला गेले आहेत. गृहमंत्री आणि भाजप नेते अमित शाह यांच्यासोबत ज्योतिरादित्य शिंदे मोदींच्या निवासस्थानी दाखल झाले. (MP congress crisis)
भाजपकडून ज्योतिरादित्य शिंदे यांना राज्यसभेवर पाठवून, त्यांना थेट केंद्रात मंत्रिपद देण्याच्या तयारीत आहे. राहुल गांधी यांच्या अत्यंत जवळचे असलेले ज्योतिरादित्य शिंदे हेच भाजपच्या संपर्कात आल्याने, काँग्रेसला मोठा झटका आहे.
ज्योतिरादित्य शिंदे हे भाजपसोबत गेल्यास, त्यांच्यासोबत अनेक काँग्रेस आमदारही पक्षाची साथ सोडण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील 48 तासात कमलनाथ यांच्या नेतृत्त्वातील काँग्रेस सरकार अल्पमतात येईल आणि भाजपचं ‘ऑपरेशन लोटस’ साध्य होईल.
20 मंत्र्यांचा राजीनामा
मुख्यमंत्री कमलनाथ यांनी रात्री उशिरा बोलावलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत 20 मंत्र्यांनी आपले राजीनामे सादर केले. नाराज असलेले काँग्रेस महासचिव ज्योतिरादित्य शिंदे यांच्या समर्थक आमदारांनी कमलनाथ यांच्याविरोधात बंड पुकारलं. ज्योतिरादित्य शिंदे यांच्या नेतृत्वातील 17 आमदारांच्या गटाशी संपर्क होत नव्हता. रात्री दहाच्या सुमारास कमलनाथ यांनी तातडीची मंत्रिमंडळ बैठक बोलावली होती. त्यावेळी 20 मंत्र्यांनी आपले ‘ना’राजीनामे कमलनाथांकडे सोपवले.
ज्योतिरादित्य शिंदेंच्या दोन अटी
राहुल गांधी यांचे निकटवर्तीय असलेले काँग्रेस महासचिव ज्योतिरादित्य शिंदे मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहेत. ज्योतिरादित्य शिंदे यांनी पक्षासमोर दोन अटी ठेवून अल्टिमेटम दिला आहे. शिंदे यांच्यासाठी भाजपप्रवेशाची ऑफर खुली असून अंतिम निर्णयही त्यांच्याच कोर्टात आहे. त्यामुळे मध्य प्रदेशातील कमलनाथ सरकार संकटात सापडलं आहे.
ज्योतिरादित्य सिंधिया यांनी भाजपचा झेंडा हाती धरल्यास राज्यसभेची उमेदवारी निश्चित आहे. याशिवाय सिंधिया समर्थक नेत्यांना राज्य सरकारमध्ये जागा मिळेल. ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या निर्णयावर मध्य प्रदेशात भाजपचं ‘ऑपरेशन लोटस’ अवलंबून असल्याचं सूत्रांनी सांगितलं.
मध्य प्रदेशातील राज्यसभेच्या जागेवरुन सुरु झालेला वाद निर्णायक टप्प्यावर पोहचला आहे. ज्योतिरादित्य शिंदे यांनी मध्य प्रदेश काँग्रेसचं अध्यक्षपद आणि राज्यसभेची जागा अशा दोन मागण्या हायकमांडसमोर ठेवल्या आहेत. शिंदे यांची इच्छा वरिष्ठांनी मान्य न केल्यास त्यांच्यासाठी भाजपप्रवेशाचा मार्ग खुला आहे. त्यामुळे ज्योतिरादित्य शिंदे यांचं राजकीय भवितव्य आता काँग्रेस हायकमांडच्या हाती आहे.
मध्य प्रदेश विधानसभेचं गणित
मध्य प्रदेशात विधानसभेच्या 230 जागा आहेत. दोन आमदारांचं निधन झाल्याने ही संख्या 228 वर पोहोचली आहे. काँग्रेसकडे 114 आमदार आहेत. इथे बहुमताचा आकडा 115 आहे. काँग्रेसला 4 अपक्ष आणि 2 बसपा, 1 सपा आमदाराने पाठिंबा दिला आहे. त्यामुळे काँग्रेसचं संख्याबळ 121 वर पोहोचलं आहे.
दुसरीकडे भाजपकडे 107 आमदारांचं संख्याबळ आहे. मात्र ज्योतिरादित्य शिंदे यांच्या बाजूचे तब्बल 20 आमदार राजीनामा देऊन भाजपला साथ देऊ शकतात. त्यामुळे काँग्रेसचं सरकार अल्पमतात येऊ शकतं.