नगरमध्ये खासदार दिलीप गांधींचे समर्थक भाजपविरोधात रस्त्यावर
अहमदनगर : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र सुजय विखे पाटील यांच्या प्रवेशाने खासदार दिलीप गांधी समर्थकांनी नाराजी व्यक्त केली आहे. तर गांधी यांच्या घरासमोर कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्याचबरोबर आता काहीतरी निर्णय घ्या, अशी मागणी देखील कार्यकर्त्यांनी केली आहे. सुजय विखे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर दिलीप गांधी समर्थक मतदारसंघातील वेगवेगळ्या ठिकाणी बैठका […]
अहमदनगर : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र सुजय विखे पाटील यांच्या प्रवेशाने खासदार दिलीप गांधी समर्थकांनी नाराजी व्यक्त केली आहे. तर गांधी यांच्या घरासमोर कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्याचबरोबर आता काहीतरी निर्णय घ्या, अशी मागणी देखील कार्यकर्त्यांनी केली आहे. सुजय विखे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर दिलीप गांधी समर्थक मतदारसंघातील वेगवेगळ्या ठिकाणी बैठका घेत आहेत. बैठकांमध्ये दिलीप गांधी यांना उमेदवारी मिळण्यासाठी सगळ्यांनी एकत्र येण्याचं आवाहन केले जात आहे.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव सुजय विखे यांनी अखेर भाजपचा झेंडा हातात घेतला. भाजपने त्यांना अहमदनगरमधून लोकसभेचं तिकीट देण्याची घोषणाही केली आहे. त्यामुळे भाजपचे नगरचे विद्यमान खासदार दिलीप गांधी यांचा पत्ता कट झालाय. गांधींनीही सुजय विखेंचं पक्षात स्वागत केलंय. शिवाय आपण पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता असून पक्षाच्या आदेशाप्रमाणे काम करत राहू, असं दिलीप गांधींनी म्हटलंय.
अहमदनगर दक्षिण मतदारसंघात भाजपचं वर्चस्व आहे. मात्र खासदार दिलीप गांधींच्या विरोधात मोठ्या प्रमाणात पक्षांतर्गत नाराजी आहे. गांधी आणि वाद हे समीकरण नेहमीचं आहे. सहाही मतदारसंघात गांधींना पक्षांतर्गत विरोध आहे. तर शिवसेनेने प्रसिद्ध केलेल्या घोटाळ्यांच्या पुस्तिकेत दिलीप गांधींचा समावेश आहे. गांधी अध्यक्ष असलेल्या अर्बन बँकेत घोटाळ्याचा आरोप गांधींवर असून न्यायालयात सुनावणी सुरु आहे.