महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीचे सर्व टप्पे पूर्ण होताच मतभेद, खदखद बाहेर येऊ लागली आहे. शिवसेना शिंदे गटातील अंतर्गत मतभेद समोर आलेत. शिवसेना उपनेते शिशिर शिंदे खासदार गजानन कीर्तिकर यांच्या विरोधात आक्रमक झाले आहेत. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिलं आहे. गजानन किर्तीकर यांनी पक्ष विरोधी वक्तव्यं केल्याने त्यांची शिवसेनेतून हकालपट्टीची मागणी केली आहे. त्यावर आता गजानन किर्तीकर यांनी उत्तर दिलय. “निवडणुकीत चॅनलने मुलाखत घेतली. गेले 20 दिवस तुमचा कुणाला पाठिंबा असे विचारले, रविंद्र वायकर यांच्या पूर्व तयारीसाठी जेवढ्या सभा झाल्यात. त्या सर्वांना मी उपस्थित होतो” असं गजानन किर्तीकर यांनी सांगितलं.
“कोल्हापूर, नाशिकला देखील मी प्रचाराला गेलो. मी आमच्या उमेदवारासाठी सर्व केले आहे. एकनाथ शिंदे एक उद्दीष्ट घेऊन आलेले आहेत. एकनाथ शिंदे यांना मी शेवटपर्यंत साथ देईन” असं गजानन किर्तीकर म्हणाले. “काही गोष्टींचा विपर्यास केला गेला. याचा मला त्रास होतो. असा प्रसंग कुणाच्याही जीवनात येऊ नये. पत्नीने सांगितली ती गोष्ट खरी आहे. माझ्या पत्नीकडे तिचं मत मागितलं” असं गजानन किर्तीकर म्हणाले.
गजानन किर्तीकरांनी सांगितलं, एकनाथ शिंदेंच्या गटात का गेलो?
“शिवसेनेचे विचार आम्ही पुढे घेऊन जात आहोत. आमचा पक्ष कुठेतरी भरकटत जात होता, म्हणून मी एकनाथ शिंदे यांच्याकडे गेलो. एकनाथ शिंदे यांच्यामागे शिवसेनेचे बळ उभे राहील. शिशिर शिंदे यांनी पत्र लिहिले की हकालपट्टी करा. शिशिर शिंदेने त्याची भावना मांडली. तो एक ध्येयवादी शिवसैनिक आहे” असं गजानन किर्तीकर म्हणाले.
‘अमोल किर्तीकर जिंकला, तर वडील म्हणून मला…’
“शिशिर तसा सेन्सेटीव आहे. त्याने मागून काही केले नाही. त्याने पत्र देऊन मागणी केली. आमच्याकडे कामाचे विभागवार वाटप केले आहे. मला सर्व बघायला वेळ मिळत नसतो. 9 बर्ष अमोल बघत होता. मी 9 वर्ष खासदार होतो, तेव्हा सर्व अमोल बघत होता ना. मी राजकारणात आहे. 57 वर्ष शिवसेनेत आहे. त्यांची भावना होती की तुम्ही शिवसेना सोडून जाऊ नका. पण एकनाथ शिंदे हे भवितव्य घडवणारा नेता आहे म्हणून मी त्यांच्याकडे गेलो. मी एकनाथ शिंदे यांना जाऊन भेटणार आहे. वायकर जिंकला काय आणि हरला काय, यात माझा काय दोष. मतदार जो ठरवतो, अमोल किर्तीकर जिंकला तर मला वडील म्हणून नक्कीच आवडेल” असं गजानन किर्तीकर म्हणाले.