12 मागण्या घेऊन नवनीत राणा पतीसह मोदींच्या भेटीला
नवनीत राणा यांनी नुकतीच भाजपाध्यक्ष आणि गृहमंत्री अमित शाह यांचीही भेट घेतली होती. मोदींसोबतच्या भेटीत त्यांनी विदर्भ आणि अमरावतीच्या विकासाबाबत विविध मागण्या समोर ठेवल्या आणि अमरावती जिल्ह्याच्या विभाजनाचीही मागणी केली.
नवी दिल्ली : अमरावतीच्या खासदार नवनीत कौर राणा यांनी पीएमओमध्ये जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी त्यांचे पती आमदार रवी राणाही उपस्थित होते. विशेष म्हणजे नवनीत राणा यांनी नुकतीच भाजपाध्यक्ष आणि गृहमंत्री अमित शाह यांचीही भेट घेतली होती. मोदींसोबतच्या भेटीत त्यांनी विदर्भ आणि अमरावतीच्या विकासाबाबत विविध मागण्या समोर ठेवल्या आणि अमरावती जिल्ह्याच्या विभाजनाचीही मागणी केली.
नवनीत राणा आणि त्यांचे पती रवी राणा यांनी मोदींसोबत जवळपास 47 मिनिटे चर्चा केली. नवनीत राणा यांनी एकूण 12 मागण्या मोदींसमोर ठेवल्या. पंतप्रधान कार्यालयाकडून या मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद देण्यात आलाय. लवकरच या मागण्या पूर्ण होतील, अशी अपेक्षा नवनीत राणा यांनी व्यक्त केली आहे.
नवनीत कौर राणा यांच्या मागण्या
अमरावती जिल्ह्याचं विभाजन करून अचलपूर जिल्ह्याची स्वतंत्र निर्मिती
चिखलदऱ्याला महाराष्ट्रातील महाबळेश्वर, माथेरान या पर्यटनस्थळांच्या धर्तीवर विकास करण्यासाठी जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून देणे
अमरावती येथील बेलोरा विमानतळ तातडीने सुरु करणे
अमरावती येथील नांदगाव पेठ पंचतारांकित एमआयडीसीमध्ये मोठे उद्योग आणणे
संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करून पेरणीपासून ते कंपनीपर्यंत शेतकऱ्यांना आलेल्या खर्चापेक्षा मूळ किमतीच्या दीडपट भावाने राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या शेतमालाची थेट खरेदी करावी, जेणेकरून शेतकरी आर्थिकदृष्ट्या मजबूत होईल
विदर्भातील बंद पडलेले सिंचन प्रकल्प लवकर सुरु करून सिंचन प्रकल्पामध्ये जमिनी गेलेल्या शेतकऱ्यांना आजच्या 2 च्या गुणकाप्रमाणे मोबदला द्यावा तसेच त्यांच्या परिवारातील दोन व्यक्तींना नोकरी द्यावी
संजय गांधी, श्रावण बाळ, अंध-अपंग तसेच विधवा निराधार महिलांना शासनाच्या योजनेअंतर्गत मिळणारे 600 रू. अनुदानावरून 2000 रुपये अनुदान करावं
नवनीत राणांची भाजपशी जवळीक?
नवनीत राणा यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यासोबत निवडणूक लढवली आणि विजय मिळवला. त्यांनी शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांचा पराभव केला होता. आघाडीकडून निवडणूक लढवली असली तरी नवनीत राणा यांची भाजपशी जवळीक असल्याचं अनेकदा दिसून आलंय. रवी राणा यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी असलेले मैत्रीचे संबंध सर्वांना माहितच आहेत. पण केंद्रात नवनीत राणाही केंद्रीय नेतृत्त्वाच्या कामाचं कौतुक करत आहेत. त्यांनी नुकतंच मोदींच्या कामाचं कौतुक केलं होतं.
दरम्यान, नवनीत राणा यांनी निवडून आल्यानंतर कामांचा धडाका लावलाय. जिल्ह्यामध्ये फिरुन समस्या समजून घेणे, प्रशासनाला योग्य आदेश देणे यासह विविध कामे त्यांच्याकडून केली जात आहेत. अमरावती जिल्ह्यातील मेळघाटात कुपोषणाचं प्रमाण मोठं आहे. याकडेही नवनीत राणा लक्ष देत आहेत. शिवाय त्यांनी संसदेतही निराधारांना जास्त मदत देण्याची मागणी केली होती.