शंभर टक्के मीच उमेदवार असणार… शिर्डीतील नेत्याचा दावा; बुधवारी होणार घोषणा
शिर्डीतील जागेवरुन महायुतीतील घटकपक्ष एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भाजपात रस्सीखेच सुरु आहे. आता एका नेत्याना थेट मेळावा घेत आपल्याच नावाची घोषणा होणार असल्याचा दावा केला आहे. दुसरीकडे महायुतीतील रामदास आठवले यांनी देखील ही जागा मागितली होती. त्यामुळे शिर्डी मतदार संघातून कोणाला तिकीट मिळतेय याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
शिर्डी लोकसभा मतदार संघातून विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे विरोधात भाऊसाहेब वाकचौरे यांच्यातच लढत होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. ही निवडणूक शिवसेना शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गटात होणार हे मात्र शंभर टक्के निश्चित झाले आहे. एकनाथ शिंदे गटाचे विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांनी महायुतीचा मेळावा घेतला. शिर्डीतून आपणच उमेदवार असल्याचा दावा यावेळी खासदार सदाशिव लोखंडे यांनी केला. येत्या बुधवारी 28 मार्च रोजी कोपरगाव येथील कार्यकर्ता संवाद मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या उमेदवारीची अधिकृत घोषणा करतील असा दावा देखील खासदार लोखंडे यांनी यावेळी केला आहे. लोखंडे यांनी यावेळी उबाठाचे संभाव्य उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांच्यावर प्रचंड तोंडसुख घेतले.
तुपामध्ये पैसे खाणारा हवा का ?
शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी महायुतीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मेळावा घेत शक्ती प्रदर्शन केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रस्तावित दौऱ्याच्या निमित्ताने ही बैठक घेतली. शिर्डीतून आपल्याच नावाची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करणार असल्याचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी यावेळी सांगितले. तुपामध्ये पैसे खाणारा खासदार जनतेला पाहीजे का ? हे जनतेने ठरवायचे आहे. त्यांची प्रशासकीय सेवा 32 वर्षे सर्व्हीस झाली आहे. माझी जनतेत सर्व्हीस झाली आहे. त्यामुळे त्याच्यापेक्षा मी बरा असा दावा सदाशिव लोखंडे यांनी केला आहे.
शिंदे यांनी कामाला लागा असा आदेश दिलाय
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मला कामाला लागा असे सांगितले आहे. महायुतीने कोणालाही तिकीट दिले तरी एकदिलाने काम करु. 2014 आणि 2019 ला उध्दव साहेबांनी आपल्याला मदत केली. आता मी शिंदे साहेबांसोबत आहे. मी 2014 ला पहिल्यांदा साखर सम्राटांमध्ये निवडून आलो. प्रस्थापितांबरोबर काही मतभेद असू शकतात, मात्र आमच्यात काही वाद नसल्याचे सदाशिव लोखंडे यांनी म्हटले आहे.
उद्धव ठाकरे यांच्यावर टीका
उध्दव ठाकरे यांनी अडीच वर्षात कुणाचेच काम केले नाही आणि आता शिर्डी दौऱ्यात माझा उल्लेख गद्दार म्हणून केला. एकेकाळी ज्यांना तूप चोर आणि गद्दार बोलले त्यालाच आता उमेदवारी देत आहेत अशा शब्दात सदाशिव लोखंडे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. भाजपातील कायकर्त्यांची नाराजी दूर होईल. प्रत्येक पक्षाला जागा मागण्याचा अधिकार असल्याचे लोखंडे यांनी यावेळी सांगितले. आज सर्व कार्यकर्ते आपल्यासोबत असल्याचा दावा देखील लोखंडे यांनी केला आहे.