खासदार सदाशिव लोखंडे महिन्याभरानंतर मतदारसंघात, शिवसैनिकांमध्ये मोठा रोष असल्यानं भाजप कार्यकर्त्यांचं गाठली शिर्डी
खासदार लोखंडे यांनी भाजप कार्यकर्त्यांच्या गराडयात शिर्डी विमानतळ ते शासकीय विश्रामगृह गाठले आणि पत्रकार परिषद घेतली. शिंदे गटात गेल्याने कार्यकर्ते माझ्यावर नाराज असतील. मात्र दोन वर्षाचा काळ असल्याने विकास कामांसह नाराज कार्यकर्त्यांनी आणलेली कामे करून त्यांची नाराजी दूर करू, असं आश्वासन लोखंडे यांनी दिलंय.
शिर्डी : उद्धव ठाकरे यांना राम राम ठोकत एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटात सहभागी झालेले खासदार सदाशिव लोखंडे तब्बल महिन्याभरानंतर दिल्लीतून आपल्या मतदारसंघात दाखल झाले. लोखंडे यांच्या बंडखोरीनंतर मतदारसंघातील शिवसैनिकांमध्ये मोठा रोष पाहायला मिळाला. त्यामुळे सदाशिव लोखंडे (Sadashiv Lokhande) यांनी भाजप कार्यकर्त्यांसह शिर्डी गाठल्याची चर्चा सध्या मतदारसंघात सुरु आहे. बंडखोरी केल्यानंतर मतदारसंघात शिवसैनिकांकडून लोखंडे यांच्या विरोधात मोठा रोष पहायला मिळाला होता. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या संवाद यात्रेत शिवसैनिकांनी बंडखोर खासदार लोखंडे यांना धडा शिकवण्याचा निर्धार केला होता. तसंच त्यांना मतदारसंघात फिरू देणार नसल्याचा इशाराही दिला होता. त्या पार्श्वभुमीवर खासदार लोखंडे यांनी भाजप कार्यकर्त्यांच्या गराडयात शिर्डी विमानतळ ते शासकीय विश्रामगृह गाठले आणि पत्रकार परिषद घेतली. शिंदे गटात गेल्याने कार्यकर्ते माझ्यावर नाराज असतील. मात्र दोन वर्षाचा काळ असल्याने विकास कामांसह नाराज कार्यकर्त्यांनी आणलेली कामे करून त्यांची नाराजी दूर करू, असं आश्वासन लोखंडे यांनी दिलंय.
‘केंद्राचा निधी मिळाला नाही आणि राज्याची साथ मिळाली नाही’
पत्रकार परिषदेत बोलताना लोखंडे म्हणाले की, राज्यात सत्तांतर झाल्यानंतर उद्धव ठाकरेंना 15 खासदार भेटलो. शिवसेनेचे खासदार काँग्रेस, राष्ट्रवादीच्या विरोधात निवडून आले. गेल्या अडीच वर्षात काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या खालच्या कार्यकर्त्यांचीही कामं झाली. पण आम्हाला केंद्राचा निधी मिळाला नाही आणि राज्याची साथ मिळाली नाही. सतत उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठपुरावा करत होतो. मात्र, त्यांना प्रशासनाचा अनुभव नसल्यानं ते कारण असू शकतं. 2014 आणि 2019 ला मला संधी मिळाली. सर्व मित्र पक्षांनी महायुतीच्या माध्यमातून मी निवडून आलो. राजकीय कौशल्य न वापरल्यानं अडीच वर्षात आम्हाला उद्धवजींकडून वेळ दिला गेला नाही. कोविडचा काळ होता, मात्र काँग्रेस राष्ट्रवादीची कामं होत होती. ती व्यथा उद्धव ठाकरे यांच्याकडे मांडली. आम्ही आघाडी विरोधात लढलो होतो. अडीच वर्षात आमची कामं झाली नाहीत, अशी खंत सदाशिव लोखंडे यांनी बोलून दाखवली.
‘एकनाथ शिंदे यांनी भरीव निधी दिला’
तसंच आमचं म्हणणं होतं दोन पावलं मागे येऊन भाजपसोबत तह करा अशी भूमिका खासदारांनी मांडली. नगरविकास खात्याच्या माध्यमातून एकनाथ शिंदे यांनी भरीव निधी दिला. आम्ही काही सत्तेचा ताम्रपट घेऊन जन्माला आलो नाही. जी संधी मिळाली तिचं सोन करण्याचा माझा प्रयत्न आहे, असंही लोखंडे म्हणाले.
‘नालायक असतो तर मला लोकांनी मत दिली नसती’
आदित्य ठाकरे यांनी केलेल्या टीकेबाबत विचारलं असता लोखंडे म्हणाले की, मी जर एवढाच नालायक असतो तर मला जनतेनं मतं दिली नसती. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी उमेदवारी दिली त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त केले. त्यांनी माझ्यासाठी मतं मागितली, मी नाही म्हणत नाही. मात्र, मी नालायक असतो तर मला लोकांनी मत दिली नसती.