आदित्य ठाकरेंच्या दौऱ्याला विरोध केल्यानंतर संजय राऊतांचा आरोप, म्हणाले “ते भाजपचे कार्यकर्ते नसून…”
फडणवीसांना सांगा की आधी त्यांची हकालपट्टी करा. त्यानंतर मग नैतिकतेच्या ढोंगी गप्पा मारा, अशी टीकाही संजय राऊतांनी केली
Sanjay Raut on BJP Shivsena Fight : आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सध्या राजकारण सुरु आहे. याच अनुषंगाने सध्या छत्रपती संभाजीनगरमध्ये आमदार आदित्य ठाकरे यांचा दौरा आयोजित करण्यात आला आहे. आदित्य ठाकरेंच्या या दौऱ्याला भाजपकडून विरोध केला जात आहे. छत्रपती संभाजीनगरममधील रामा हॉटेलबाहेर भाजप आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्ते आमने-सामने आले. आता या घटनेवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार टीका केली. हे झेंडे फडकवणारी लोकं भाजपचे सर्व पेड वर्कर आहेत, असा आरोप संजय राऊत यांनी केला.
“भाजपकडे सध्या काही काम नाही. भाजप पक्ष हा एक भ्रमिष्ट पक्ष आहे. या राज्यात त्यांचे सरकार आल्यापासून महिला अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. अल्पवयीन मुलींच्या अत्याचारात वाढ झाली आहे. बदलापूरची घटना घडल्यानंतर महाराष्ट्रात २७ ठिकाणी लहान मुलींवर अत्याचार झाले आहेत. त्यांना याबाबत प्रश्न विचारले की मग भाजपचे कार्यकर्ते बनावट प्रकरणं निर्माण करतात. खरं तर ते भाजपचे कार्यकर्ते नसून पगारी नोकर आहेत. त्यांचं आयटी सेल, झेंडे फडकवणारी लोकं हे सर्व पेड वर्कर आहेत”, असा थेट आरोप संजय राऊत यांनी केला.
“मग नैतिकतेच्या ढोंगी गप्पा मारा”
“भाजपचे हे लोक महाविकासआघाडीबद्दल ज्या भूमिका घेत आहेत, त्या बनावट आणि खोटारड्या भूमिका आहेत. त्यांच्या सरकारमध्ये किमान दोन मंत्री असे आहेत, ज्यांच्यावर थेट अशाप्रकारचे आरोप आहे. फक्त आरोप नाही, तर त्या महिलांनी आत्महत्या केल्या आहेत. उद्धव ठाकरेंनी त्या मंत्र्यांचा राजीनामा घेतला होता. ते मंत्री भाजपच्या मंत्रिमंडळात बसले आहेत. त्यामुळे आधी जा आणि फडणवीसांना सांगा की त्या मंत्र्यांचा राजीनामा घ्या किंवा त्यांची हकालपट्टी करा. त्यानंतर मग नैतिकतेच्या ढोंगी गप्पा मारा”, अशी टीकाही संजय राऊतांनी केली.
“आम्हाला काहीही फरक पडत नाही”
यावेळी संजय राऊतांना ठाकरे कुटुंबावर सातत्याने केल्या जाणाऱ्या टीकेबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी स्पष्ट भाषेत प्रतिक्रिया दिली. “ठाकरे कुटुंब हे राज्यातील लोकप्रिय कुटुंब आहे. लोकांची त्यांच्यावर श्रद्धा आहे. लोकांचा विश्वास त्यांच्याकडे आहे. ठाकरे कुटुंबाबद्दल अशाप्रकारच्या भूमिका घेणं म्हणजे तळपत्या सूर्यावर थुंकण्यासारखे आहे. यातून आम्हाला काहीही फरक पडत नाही. त्याउलट तुमचेच मुखवटे गळून पडत आहेत”, असे संजय राऊतांनी म्हटले.