तो त्यांचा दिखावा, त्यांना माफी मागावीच लागेल; संजय राऊत यांचा इशारा
भाजप आणि मनसे असेल... या दोन्ही पक्षात आमचे सहकारी आहेत. मित्रं आहेत. आम्ही एकमेकांशी बोलत असतो. पण किती लोकांना आमची चिंता वाटली?
मुंबई: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त विधान केलं. त्यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजपला इशारा दिला आहे. त्यांना माफी मागावीच लागेल, असा इशाराच संजय राऊत यांनी दिला आहे. त्यामुळे राज्यपाल काय स्पष्टीकरण देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. मात्र राज्यपाल कोश्यारी यांच्याविरोधात गेल्या तीन दिवसांपासून राज्यपालांविरोधात राज्यात आंदोलन सुरू असतानाही राज्यपालांनी अजूनही आपली भूमिका स्पष्ट न केल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
मी राहुल गांधीच्या वक्तव्याचं समर्थन करत नाही. बचाव करत नाही. हा फरक आहे. तुम्ही शिवाजी महाराजांबद्दल कोणी बोललं असतं तर तुम्ही थयथयाट केला असता. आज तुमचे राज्यपाल, तुमचे प्रवक्ते सरळ सरळ महाराजांचा आवमान करतात. त्याचे पुरावे आहेत.
तरीही तुम्ही त्यांचा बचाव करत आहात. यावरून तुमचं महाराष्ट्राचा स्वाभिमान आणि शिवाजी महाराजांबद्दलचं प्रेम दिखावा आहे हे स्पष्ट होतं, अशी टीका करतानाच त्यांना माफी मागावीच लागेल, असा इशारा संजय राऊत यांनी दिला.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी संजय राऊत यांना फोन करून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. राहुल गांधी यांचा काल रात्री उशिरा फोन होता. आधीही त्यांनी चौकशी केली होती.
काल प्रत्यक्ष चौकशी केली. प्रकृतीची विचारपूस केली. आम्हाला तुमची चिंता होती. तुम्ही तुमच्या प्रकृतीची काळजी घ्या. असं त्यांनी प्रेमाने विचारलं, असं राऊत यांनी सांगितलं.
राजकारणात कडवटपणा आला आहे. त्यात ही प्रेमाची झुळूक होती. राजकारणात मित्रं मित्र राहत नाही. लोक पळून जातात. मी तुरुंगात असताना किती लोक माझ्या घरी आले? मला माहीत आहे. किती लोकांनी चौकशी केली मला माहीत आहे. ठाकरे परिवार, आमचा पक्ष, काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील माझ्या सहकाऱ्यांनी चौकशी केली, असं ते म्हणाले.
भाजप आणि मनसे असेल… या दोन्ही पक्षात आमचे सहकारी आहेत. मित्रं आहेत. आम्ही एकमेकांशी बोलत असतो. पण किती लोकांना आमची चिंता वाटली? एका खोट्या प्रकरणात अडकवून आपल्या राजकारणातील सहकाऱ्याला तुरुंगात टाकलं, त्याच्या घरची काय परिस्थिती असेल, किती लोकांनी चौकशी केली?
अशावेळी राहुल गांधींसारखं नेतृत्व देशभरात प्रेमाने फिरत आहे. राजकीय मतभेद थोडेफार असतानाही त्यांनी माझी चौकशी केली, असं त्यांनी सांगितलं.