मुंबई : महाराष्ट्रातील मराठा आरक्षणासह विविध मुद्द्यांवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाणही उपस्थित होते. ही बैठक तब्बल 1 तास चालली. त्यानंतर मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांमध्येही एकांतात अर्धा तास चर्चा झाली. त्यानंतर राज्यात राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. अशावेळी चर्चा तर होणारच, अशा शब्दात संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्याचबरोबर पंतप्रधान मोदी यांनी कुणाच्याही मध्यस्तीशिवाय महाराष्ट्राच्या प्रश्नात लक्ष घातलं हे महत्वाचं असल्याचंही संजय राऊत म्हणाले. (Sanjay Raut’s reaction to the meeting between PM Modi and CM Thackeray)
मुख्यमंत्र्यांनी मांडलेल्या विषयांबाबत पंतप्रधान मोदींचा दृष्टीकोन सकारात्मक असल्याचं सांगितलं जात आहे. ज्यांना या भेटीचे राजकीय संदर्भ काढायचे असतील त्यांनी काढावेत. केंद्र आणि राज्यात संघर्ष नसावा, राज्यांच्या संकटकाळात केंद्राने, पंतप्रधानांनी मदत करावी. राज्यात आणि केंद्रात सुसंवाद असावा ही राज्याची भूमिका आहे. दरम्यान आत पंतप्रधान मोदींनी 1 तास महाराष्ट्राचे प्रश्न ऐकून घेतले तर संघर्षाची भाषा कशाला, असंही राऊत म्हणाले. आता महाराष्ट्राचे अनेक प्रश्न मार्गी लागतील, अशी आशाही संजय राऊत यांनी मोदी-ठाकरेंच्या भेटीनंतर व्यक्त केलीय.
दरम्यान, पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यामध्ये एकांतात अर्धा तास चर्चा झाल्याचंही सांगितलं जात आहे. त्याबाबत मुख्यमंत्र्यांनीही स्पष्ट केलंय. या भेटीवरुन राज्यात पुन्हा एकदा भाजप आणि शिवसेना एकत्र येणार का, अशी चर्चा सुरु झाली आहे. त्याबाबत विचारलं असता आतमध्ये बैठक सुरु असताना दोन खंबीर शिलेदार बाहेर होते, असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलंय. दरम्यान, पंतप्रधान आणि ठाकरे यांच्यातील ही भेट 10 ते 15 मिनिटे चालेल असं बोललं जात होतं. पण भाजप नेत्यांचे अंदाज नेहमीच चुकत आले आहेत. आताही ते चुकतील, असा टोला संजय राऊत यांनी लगावलाय.
या भेटीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र सदन येथे येऊन प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ‘मोदी आणि आमचे व्यक्तिगत संबंध आहेत. हे सर्वांना माहीत आहे. ही गोष्ट लपलेली नाही आणि लपवण्याची गरज नाही. आज आम्ही राजकीयदृष्ट्या एकत्र नाही. पण म्हणून आमचं नातं तुटलेलं नाही. मी मोदींना भेटलो म्हणजे काही तरी चूक केलं असं नाही. मी काही नवाब शरीफांना भेटलो नाही. आताही माझ्या सहकाऱ्यांना सांगून मी मोदींना भेटायला जाऊ शकतो’, असं सांगतानाच सत्तेत एकत्र नसलो तरी नातं तुटलं नाही, असं सूचक विधान मुख्यमंत्र्यांनी केलं.
संबंधित बातम्या :
मोदी-ठाकरेंची व्यक्तिगत भेट झाली असेल तर स्वागतच, या भेटीचा राज्याला फायदाच होईल: फडणवीस
‘उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदींची घेतलेली भेट राजकीय तडजोडीसाठी’, खासदार उदयनराजेंचा आरोप
Sanjay Raut’s reaction to the meeting between PM Modi and CM Thackeray