उद्धव ठाकरे यांनी 24 मिनिटात नेमकी काय पाहणी केली?; शिंदे गटाच्या खासदाराचा खोचक सवाल
धनुष्यबाण मिळावं यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कायदेशीर लढाई लढत आहे. धनुष्यबाण चिन्हं हे बाळासाहेबांच्या खऱ्या शिवसेनेलाच मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
पुणे: राज्यातील सत्तेतून पायउतार झाल्यानंतर आणि शिवसेनेत (shivsena) फूट पडल्यानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) पहिल्यांदाच शेतकऱ्यांच्या बांधावर गेले. शेतकऱ्यांच्या पिकांची पाहणी केल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारवर घणाघाती हल्ला चढवला. त्यावर सत्ताधाऱ्यांनीही पलटवार केला आहे. शिंदे गटाचे खासदार श्रीरंग बारणे (shrirang barne) यांनीही उद्धव ठाकरे यांच्या या दौऱ्याची खिल्ली उडवणारं विधान केलं आहे. उद्धव ठाकरे शेतकऱ्यांच्या बांधावर फक्त 24 मिनिटं होते. या 24 मिनिटात त्यांनी काय पाहणी केली? असा खोचक सवाल श्रीरंग बारणे यांनी केला आहे.
खासदार श्रीरंग बारणे यांनी टीव्ही9 मराठीशी संवाद साधताना हा सवाल केला आहे. विरोधी पक्षाचा नेता सरकारवर टीका करतोच. त्याचं ते काम असतं. सरकार म्हणून चांगल्या प्रकारचं काम या सरकारने तीन महिन्यात केलं आहे. हे तुम्ही पाहत आहात. काल उद्धव ठाकरे यांच्यासोबत मीडिया होता. तुम्हीच सांगता त्यांनी 24 मिनिटाचा दौरा केला. या 24 मिनिटात सर्व परिस्थितीची त्यांनी पाहणी केली. त्यांनी या 24 मिनिटात काय पाहणी केली असणार? ते परिस्थितीला कसे सामोरे जाणार त्यांनाच विचारा, असा चिमटा बारणे यांनी काढला.
कोणताही पक्ष असावा राज्यातील जनता सुखी व्हावी हा हे सरकारचं काम आहे. ते काम हे सरकार करत आहे. बाळासाहेबांच्या विचाराचं सरकार सत्तेत आहे. भाजपसोबत आहे. त्यामुळे हे सरकार निश्चित जनतेच्या समस्या सोडवण्यात यशस्वी होईल, असं ते म्हणाले.
यावेळी त्यांनी धनुष्यबाण चिन्हं आपल्यालाच मिळेल असा दावा केला. धनुष्यबाण मिळावं यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कायदेशीर लढाई लढत आहे. धनुष्यबाण चिन्हं हे बाळासाहेबांच्या खऱ्या शिवसेनेलाच मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान, काल उद्धव ठाकरे औरंगाबादच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पिकांची पाहणी केली. तसेच शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी एका शेतकऱ्याने त्यांना आसूड देण्याचा प्रयत्न केला. तेव्हा हा आसूड तुमच्याकडेच ठेवा. शेतकऱ्यांकडेच हा आसूड शोभून दिसतो. तुम्ही कधी तरी हा आसूड चालवा. त्याशिवाय हे लोक काही करणार नाहीत, असा हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारवर केला.