महाराष्ट्रातील लोकांना हे सरकार, मुख्यमंत्री नको आहेत : सुप्रिया सुळे
आम्हाला हे मुख्यमंत्री नको, असं चॅनलच्या सर्व्हेमध्ये लोकांनी सांगितलं. हे सरकार आणि मुख्यमंत्री बदलायला हवेत, असं आता लोकांना वाटत आहे, असं चॅनेलच्या सर्व्हेमध्ये दाखवल्या जात असल्याचं खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितलं.
नाशिक : आम्हाला हे मुख्यमंत्री नको, असं चॅनलच्या सर्व्हेमध्ये लोकांनी सांगितलं. हे सरकार आणि मुख्यमंत्री बदलायला हवेत, असं आता लोकांना वाटत आहे (Supriya Sule on BJP). कारण या सरकारने पाच वर्षात भाषणांशिवाय आणखी काहीही केलं नाही, असं राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितलं. या सरकारने फक्त लोकांना फसवायचं काम केलं आहे, असा आरोप सुप्रिया सुळे यांनी केला (Supriya Sule on BJP).
नाशिकच्या येवला येथे राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्या प्रचारासाठी सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत सुप्रिया सुळे यांनी भाजप-शिवसेना युती सरकारवर जोरदार टीका केली (Supriya Sule on BJP).
राज्यातील 55 ते 60 टक्के लोकांच्या मते, सत्ता परिवर्तन व्हायला हवं, असं चॅनलच्या सर्व्हेमध्ये दाखवण्यात येत आहे. दुसऱ्या सर्व्हेत देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री म्हणून नकोत, असं सांगितलं जात आहे. हे मी नाही तर सर्व्हे म्हणत आहे. पण माझ्यामतेही हे सरकार जायला हवं कारण त्यांनी पाच वर्षात महाराष्ट्रासाठी काहीही केलेलं नाही, त्यांनी फक्त भाषणं केली आणि गाजराचा पाऊस पाडला, जुमले बस्स आणखी काहीही या सरकारने केलं नाही. यांनी फक्त सामन्यांना फसवण्याचं काम केलं आहे, अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केली.
तसेच, सुप्रिया सुळे यांनी शिवसेनेच्या 10 रुपयात थाळी या योजनेचीही खिल्ली उडवली. ‘यांचा शिव वडापाव 15 रुपयांत मिळतो आणि हे 10 रुपयांत थाळी देण्याचं बोलतात. हे कसं शक्य आहे. एक म्हणतो आम्ही 10 रुपयात थाळी देऊ, तर दुसरा म्हणतो 5 रुपयात थाळी सागंतो. आम्ही मराठी माणसं साधी आहोत, पण इतकी पण साधी नाही’, असं म्हणत सुप्रिया सुळेंनी शिवसेनेवर निशाणा साधला.
सुप्रिया सुळे यांनी शेतकरी कर्जमाफीच्या मुद्यावरुनही सरकारला घेरलं. ‘यांचा सर्वात आवडता विषय म्हणजे, आम्ही सत्तेत आलो की, कर्जमाफी करु. मला त्यांना आठवण करु द्यावी वाटते की, तुम्ही सत्तेत आहात. त्यांना अजूनही असं वाटतं की, ते सत्तेत नाहीत आणि आम्हाला अजूनही वाटतं की, आम्ही सत्तेत आहोत. कारण आम्ही कामं करतो’, असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी युती सरकारवर टीका केली.
प्रशासनाचा अनुभव खूप महत्त्वाचा असतो. उत्तम प्रशासक असेल तर त्याला सत्तेत असल्याने किंवा नसल्याने फरक पडत नाही, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या. तसेच, यावेळी त्यांनी छगन भुजबळ यांच्यावर स्तुतीसुमनं उधळली.