Breaking | संसदेतील शिवसेना कार्यालय एकनाथ शिंदेंच्या ताब्यात, राजकारणात वेगवान घडामोडी!
काल महाराष्ट्र विधीमंडळातील शिवसेना कार्यालयात एकनाथ शिंदे गटातील आमदारांनी ताबा मिळवला. त्यानंतर आता संसदेतील शिवसेना कार्यालयात एकनाथ शिंदे गटाच्या खासदारांनी प्रवेश केल्याचं वृत्त आहे..
संदीप राजगोळकर, नवी दिल्ली : सुप्रीम कोर्टात एकनाथ शिंदे यांची बंडखोरी आणि शिवसेना पक्षावर दावा ठोकणं किती अवैध आहे, हे पटवून देण्यासाठी ठाकरे गटाकडून जोरदार युक्तिवाद सुरु असतानाच राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. यापैकीच एक माहिती समोर आली आहे. संसदेतील शिवसेना कार्यालयावरही एकनाथ शिंदे गटाने ताब्यात घेतलं आहे. काल महाराष्ट्र विधीमंडळातील शिवसेना कार्यालयात एकनाथ शिंदे गटातील आमदारांनी ताबा मिळवला. त्यानंतर आता संसदेतील शिवसेना कार्यालयात एकनाथ शिंदे गटाच्या खासदारांनी प्रवेश केला.
राहुल शेवाळेंचं पत्र
भारतीय संसदेतील शिवसेना पक्षाचं कार्यालय आता एकनाथ शिंदे यांच्या ताब्यात आलं आहे. खासदार राहुल शेवाळे हे शिंदे गटाचे गटनेते आहेत. शेवाळे यांनी केंद्रीय सचिवालयाला यासंदर्भातील पत्र दिलं होतं. निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष एकनाथ शिंदे यांचा असल्याचा निर्वाळा केल्यानंतर संसदेतील शिवसेना कार्यालयावर एकनाथ शिंदे गटाचा ताबा मिळावा, अशी मागणी या पत्रातून करण्यात आली होती. त्यानुसार, राहुल शेवाळे यांच्या नेतृत्वात शिंदे गटाने आज संसदेतील शिवसेनेच्या कार्यालयात आज एकनाथ शिंदे यांच्या खासदारांनी प्रवेश घेतला.
सुप्रीम कोर्टात आज काय?
महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाच्या महासुनावणीला आज पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे. सुरुवातीलाच शिवसेनेने काल दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी झाली. निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरेंविरोधात दिलेल्या निकालाला सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यात आले आहे. आयोगाने चुकीचा निर्णय घेतला असून घटनापीठातील सुनावणी पूर्ण होईपर्यंत या निर्णयाला स्थगिती मिळावी, अशी मागणी ठाकरे गटातर्फे काल दाखल केलेल्या याचिकेत करण्यात आली आहे. या याचिकेवरील सुनावणी उद्या म्हणजेच बुधवारी दुपारी 3.30 वाजता होईल, असे कोर्टाकडून सांगण्यात आले आहे. तर दुसरीकडे सत्तासंघर्षाच्या सुनावणीत आज ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांना त्यांचे पूर्ण मुद्दे मांडण्याच्या सूचना कोर्टाने दिल्या आहेत. एकनाथ शिंदे यांचं बंड आणि पक्ष बळकावण्याची प्रक्रिया कशा रितीने बेकायदेशीर होती, यासंदर्भातील मोठा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी कोर्टात केलाय. विधीमंडळातील पक्षनेत्यांचा गट, त्यांचे अधिकार, पक्षनेतृत्वाचे अधिकार, फुटीर गटाच्या मर्यादा, राज्यपालांचे अधिकार यावरून कपिल सिब्बल यांनी सुप्रीम कोर्टासमोर अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.
राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक
दिल्लीप्रमाणेच महाराष्ट्रातही राजकीय घडामोडी घडत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक आयोजित केली आहे. मुंबईत संध्याकाळी ७ वाजता ही बैठक होईल. यात शिंदे गटाचे आमदार आणि खासदार उपस्थित असतील. याच बैठकीत एकनाथ शिंदे पक्ष प्रमुख पद स्वीकारतील, अशी चर्चा आहे.